
हिंदुस्थानात कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत रोज दहा हजारांवर नवे रुग्ण सापडले. नोव्हेंबर महिन्यात भयानक परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. त्यावेळी रुग्णांची संख्या इतकी असेल की, आयसोलेशन वॉर्ड्स आणि आयसीयूतील बेड्स कमी पडतील. व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती आयसीएमआरच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
नोव्हेंबरची लाट आव्हानच
लॉकडाऊन हटवल्यानंतरही हातांची स्वच्छता राखणे, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशा उपाययोजनांचे पालन केले जात आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचा उपयोग होऊ शकेल. नंतर मात्र परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे मंदावलेली कोरोनाची लाट पुन्हा उसळेल. ती रोखणे म्हणजे आव्हानच असेल असे संशोधकांनी या अहवालात म्हटले आहे.
लस आल्याशिवाय कोरोना निर्मूलन कठीण
वैद्यकीय चाचण्या, उपचार आणि आयसोलेशनमुळे लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात आपण 70 टक्के यशस्वी ठरलो होतो. तसेच सुमारे 60 टक्के मृत्यू टाळू शकलो होतो. परिस्थितीचा अंदाज घेऊन धोरणे ठरवतानाच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण केल्याचा तो परिणाम होता. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस आल्याशिवाय या साथीचे निर्मूलन करता येणार नाही असे विश्लेषण या अहवालात मांडले गेले आहे.
देशातील सद्यस्थिती
- 958 कोविड रुग्णालयांमध्ये 1,67,883 आयसोलेशन बेड्स, 21,614 आयसीयू बेड्स, 73,469 ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स
- 2,313 कोविड हेल्थ सेंटर्समध्ये 1,33,037 आयसोलेशन बेड्स, 10,748 आयसीयू बेड्स, 46,635 ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स
- 7,525 कोविड हेल्थ सेंटर्समध्ये 7,10, 642 बेड्स
- कोविड बेड्सना 21,494 व्हेंटिलेटर्स
- आणखी 60, 848 व्हेंटिलेटर्स लावण्याची तयारी
लॉकडाऊनुळे रोखता आला 97 टक्के संसर्ग
आयसीएमआरने स्थापन केलेल्या ऑपरेशन रिसर्च ग्रुपमधील संशोधकांनी हा अहवाल बनवला आहे. देशात वेळीच लॉकडाऊन करण्यात आल्याने कोरोनाची महामारी 36 ते 76 दिवस पुढे ढकलण्यात यश आले. लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाणही 69 ते 97 टक्के इतके रोखता आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही या साथीविरुद्ध प्रभावीपणे लढण्यास आणि तयारी करण्यास वेळ मिळाला, असे या अहवालात म्हटले आहे.
अहवाल सांगतो की नोव्हेंबर नंतर…
साडेपाच महिने आयसोलेशन वॉर्डमध्ये बेड अपुरे पडणार
साडेचार महिने आयसीयू बेड्सची कमतरता भासणार
साडेतीन महिने व्हेंटिलेटर्सचा तुटवडा




























































