
धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असली तरी काही तालुक्यात शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पाऊस कधी बरसणार याची वाट बघत आहेत.
मान्सुनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने जिह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. सध्याही ढगाळ वातावरण असून अधून – मधून पावसाच्या सरी येत आहेत. मात्र जिल्ह्यात आठ तालुक्यांपैकी चार तालुक्यात समाधानकारक तसेच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. तर उर्वरित 4 तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. धाराशिव, कळंब, भूम आणि वाशी तालुक्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धाराशिव तालुक्यात आतापर्यंत 103.4 मिमी., कळंब तालुक्यात 159.50 मिमी, भूम तालुक्यात 151.80 मिमी तर वाशी तालुक्यात तब्बल 190.34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील काही महसूल मंडळांमध्ये तर सलग दोन ते तीन दिवस अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे या भागातील नद्या, ओढे यांनाही पाणी आली आहे. तसेच पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि परंडा तालुक्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नाही. येथील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असून उमरगा तालुक्यातील काही गावांना तर अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यात आतापर्यंत 77.14 मिमी, उमरगा तालुक्यात 44.60 मिमी, लोहारा तालुक्यात 72.34 मिमी तर परंडा तालुक्यात केवळ 61.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चारही तालुक्यात 100 मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस झाला आहे आहे. त्यामुळे या भागातील पेरणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 107.57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 15.69 टक्के पाऊस पडला आहे.























































