
>> दिलीप जोशी
आशिया खंडातील कर्तृत्ववान व्यक्तींना 1958 पासून दिला जाणारा मॅगसेसे पुरस्काराचा सोहळा यंदा होणार नाही. त्याचं कारण अर्थातच कोरोना. कोरोनामुळे जनसामान्यांचं घराबाहेर पडणं बंद झालं. सर्व वाहनव्यवहारांना ‘ब्रेक’ लागला. उद्योग क्षेत्रातली यांत्रिक धडधड थंडावली. सण, उत्सव, सभा, संमेलनं एवढंच काय, विवाहासारखी मंगल वेळ आणि वियोगासारखे दु:खद प्रसंगही ‘कोरोना’ने ग्रासले. अगदीच अनिवार्य असेल तिथे मोजक्या माणसांना, सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळून वेळ निभावून न्यावी लागली. आपल्या महाराष्ट्रात रंगपंचमीपासून कोरोनाची कुजबूज सुरू झाली आणि त्या सणाचा बेरंग झाला. मग गुढीपाडवा तसाच गेला. अनेक उत्सव साजरे करणं कठीण झालं. ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ अत्यावश्यक असल्याने काही कटू निर्णय सरकारलाही घ्यावे लागले. शिस्त आणि संयम याला पर्याय नव्हता आणि आता हळूहळू परिस्थिती निवळत असताना सर्वांनी आधी सावधपणे राहण्याची गरज आहे. ‘कोरोना’ गेल्यावर येणार्या आर्थिक पेचप्रसंगाला सामोरं जायची तयारी जिद्दीने करावी लागणार आहे.
येत्या 1 जुलैला आषाढी एकादशी. नेहमीसारखं वातावरण असतं. तर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत हजारो भक्तांचा मेळा, दिंड्या घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात निघाला असता. ती संधी कार्तिकी एकादशीला मिळेल अशी आशा करूया. याशिवाय अनेक धर्मीयांचेही अनेक समारंभ रद्द झालेत. क्रीडा क्षेत्रावर कोरोनाचं सावट पडल्याने आयपीएलपासून ऑलिंम्पिकपर्यंत जगभरच्या क्रीडा महोत्सवाचं काय यावर प्रश्नचिन्ह लागलंय. साहित्यिक कार्यक्रम पुढे ढकलावे लागलेत. वृत्तपत्रेही कागदी प्रतींऐवजी ‘ऑनलाइन’वर आपली तहान भागवतायत. परीक्षांचा प्रश्न शिक्षण क्षेत्राचीच परीक्षा घेतोय. थोडक्यात एकेक गोष्ट ‘रद्द’ करता करता त्याचा नाईलाजाने स्वीकार करावा लागतोय. उद्या हे चित्र जरूर बदलेल. कोणतंही संकट काही अनंतकाळ राहात नाही. एक दिवस ‘कोरोना’सुद्धा बंद होईल. तो दिवस लवकर यावा हीच सगळ्यांची अपेक्षा.
…तर मुद्दा मॅगसेसे पुरस्काराचा. आशियाचं ‘नोबेल’ समजला जाणारा हा सन्मान फिलिपाईन्सचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. त्यासाठी आशियातील विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींची निवड होते. अमेरिकेतील रॉकफेलर फंड आणि फिलिपाईन्सचं सरकार यांच्यातर्फे ‘रॅमन मॅगसेसे’ अॅवॉर्ड फाऊंडेशन या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करतं.
रॅमन डी फिरो मॅगसेसे या फिलिपाइन्स या मलेशियापलीकडे असलेल्या सुमारे साडेसात हजार बेटांच्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी 1953 मध्ये मिळाली. ऑटोमोबाईल मेकॅनिकल असलेले रॅमन तरुण वयात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने दुसर्या महायुद्धात लढले. दोस्त म्हणजे अमेरिका, रशिया, इंग्लंड त्या वेळी हिंदुस्थानसह अनेक देशात ब्रिटिशांची वसाहत असल्याने त्यांच्या सैन्यात अनेक देशांतले तरुण होते. आपलेही होते. मॅगसेसे यांनी जपानी सैन्याच्या सापळ्यातून दोन-तीन वेळा शिताफीने सुटका करून घेतली. पुढे ते फिलिपाईन्सचे लोकशाहीवादी, लोकप्रिय अध्यक्ष झाले. 1957 मध्ये वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी त्यांचं विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर 1958 पासून ‘मॅगसेसे अॅवॉर्ड’ सुरू झालं.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आतापर्यंत सुमारे 45 हिंदुस्थानींना मिळाला. त्यात मराठी नावं बरीच आहेत. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना पहिल्याच वर्षी म्हणजे 1958 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला. पुढच्याच वर्षी प्रज्ञावंत अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान झाला. त्यानंतर डॉ. रजनीकांत आणि डॉ. मेबल आरोळे या दाम्पत्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना आणि कालांतराने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आलं. पांडुरंगशास्त्री आठवले यांनाही हा सन्मान लाभला. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची कर्मभूमी महाराष्ट्रच. त्यांनाही मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
याशिवाय देशातील नामांकित ‘मॅगसेसे’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये जयप्रकाश नारायण, कमलादेवी चट्टोपाध्याय, एम. एस. सुब्बलक्ष्मी, टी. एन. शेषन, शंभू मित्रा, बी. जी. वर्गीस, मदर टेरेसा, वर्गिस कुरियन, पं. रविशंकर अशा सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, सेवा आणि कला, संशोधन अशा अनेक क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश होतो. चित्रपट कारकीर्दीसाठी सत्यजीत राय यांनाही मॅगसेसे अॅवॉर्ड मिळालं. राजकीय क्षेत्रातील एकच व्यक्ती त्यात आतापर्यंत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल! फिलिपाइन्सच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि लढवय्या नेत्या कॉरेझॉन अकिनो यांनाही मिळालेला हा सन्मान यंदापुरता रद्द झालाय. पुढल्या वर्षी हिंदुस्थानात कोणाला मिळतो का ते पाहायचं.




























































