
पृथ्वी नावाच्या सुमारे 12,800 किलोमीटर व्यासाच्या आपल्या पाणीदार आणि त्यामुळेच अवकाशातून निळ्याशार दिसणार्या ग्रहाची अनेक वैशिष्टय़े आहेत. ‘आभाळमाये’चा विचार करताना आपली नजर आकाशाकडे लागलेली असते. तारांगणातील विविध गोष्टी जाणून घेणे ही गोष्ट एक उत्सुकता म्हणून आणि अभ्यास म्हणूनही खूप महत्त्वाची. परंतु अंतराळाचा विचार करताना आपणही त्याचाच एक भाग आहोत हे चटकन लक्षात येत नाही. आपला ‘भूगोल’ हा ‘ख’गोलाचाच एक अत्यंत सूक्ष्म असा हिस्सा आहे आणि आपण पृथ्वीसारख्या निसर्गाने समृद्ध केलेल्या, वातावरणाने सुरक्षित केलेल्या ग्रहावर आहोत म्हणूनच अवकाशाचा निर्वेधपणे वेध घेऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे. भूपृष्ठावरूनच आपण अवकाशात अनेक याने सोडली आहेत. म्हणजेच भूगोल-खगोलचे नाते अतूट असेच आहे.
आपल्या पृथ्वीच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक आहे पृथ्वीचे मॅग्नॅटिक फिल्ड (चुंबकीय क्षेत्र) आणि मॅग्नॅटिक पोल (चुंबकीय ध्रुव). पृथ्वीचा भौगोलिक अक्ष साडेतेवीस अंशांनी कललेला असल्याने या ग्रहावर ऋतुचक्र निर्माण झालं. आतासुद्धा सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर तळपत आहे. कारण त्याचे उत्तरायण सुरू आहे. येत्या एकवीस तारखेला ते संपेल आणि ‘दक्षिणायण’ सुरू होईल. या काळात आपल्याकडे इतका पाऊस पडतो की जगात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानलेला आपला एकमेव देश असावा.
पृथ्वीचा भौगोलिक ध्रुव परांचन, म्हणजे स्वतःभोवती गिरकी घेण्याच्या गतीने किंचित बदलतो म्हणून 2600 वर्षांत तीन ‘ध्रुवतारे’ होतात. ते कसे घडते याविषयी ‘ध्रुवतारा ‘अढळ’ नसतो?’ या लेखात आपण माहिती घेतलीय. अशा या भौगोलिक ध्रुवाप्रमाणेच पृथ्वीचा एक मॅग्नॅटिक ध्रुवसुद्धा आहे. तो भौगोलिक ध्रुवाशी मेळ साधत नाही. त्याची तऱहा वेगळीच आहे. काळाच्या ओघात तो चक्क उलटा-पालटा होऊ शकतो. म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे चुंबकीय ध्रुवाचा दक्षिण भाग येऊ शकतो. तसे झाले तर होकायंत्र किंवा ‘मरीनर्स कंपास’ दिशादर्शनाचा चकवा देईल. अर्थात ध्रुवतारा, सप्तर्षी वगैरे ‘मंडळी’ दिशा दाखवतील आणि आता तर ‘दिग्दर्शना’ची विविध ‘ऍप’ उपलब्ध आहेत.
पृथ्वीचे मॅग्नॅटिक क्षेत्र गाभ्यात निर्माण होते आणि थेट अंतराळात हजारो किलोमीटरपर्यंत त्याचा पसारा असतो. पृथ्वीच्या अंतर्भागात कठीण कवचाखाली (प्लेट टॅकटॉनिक) तप्त धातुरस आहे. त्याच्या घुसळणीतून जे प्रवाह (करंट) तयार होतात त्यातून हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. याला ‘डायनॅमो इफेक्ट’ म्हणतात. सायकलस्वार सायकलच्या मागच्या चाकाजवळ डायनॅमो लावून त्यावर पुढचा हेडलाइट चालवताना जे घडते तसेच या मॅग्नॅटिक फिल्डमध्ये घडते. त्यातूनच पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव तयार झाला असून तो भौगोलिक ध्रुवापासून वर्षाला सुमारे 11 ते 20 किलोमीटर सरकत आहे आणि कॅनडाच्या पूर्वेकडे सरकत आहे. कालांतराने तो आणखी सरकत ‘उलट’ होईल. त्याचा संबंध फक्त होकायंत्राशी. परंतु पृथ्वीचे मॅग्नॅटिक फिल्ड कमकुवत होतेय का?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अवकाशात दूरवर पसरल्याने ते सूर्याकडून येणार्या भारित अणूंना किंवा ‘चार्जर्ड पार्टिकल्स’ना थोपवून धरते. त्यामुळे आपल्या वातावरणातील ‘ओझोन’ वायूचा (O3) संरक्षक भर अबाधित राहतो. पृथ्वीला चुंबकीय क्षेत्र नसते तर वातावरणातला ओझोन कधीच नष्ट झाला असता आणि आपल्या सभोवतील जीवसृष्टी (आपल्यासकट) अस्तित्वात आली नसती. सूर्यप्रकाशातील त्रासदायक अल्ट्राव्हायलेट किरणांपासूनही आपला बचाव याच चुंबकीय क्षेत्रामुळे होतो.
गेल्या 150 वर्षांत पृथ्वीचा मॅग्नॅटिक शक्तिपात होत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. या काळात पृथ्वी मॅग्नॅटिक शक्तीच्या बाबतीत सुमारे 10 टक्के ‘अशक्त’ झाल्याचे म्हटले जाते. आणखी दोन हजार वर्षांत हे प्रमाण 30 टक्क्यांवर जाऊ शकते. पूर्वी ते नेमके किती होते याची नोंद पोलर मॅग्नॅटिझमद्वारे समजते. ज्वालामुखीजन्य कातळात ती सापडल्याने त्यांचे ‘वय’ ठरवता येते.
पृथ्वीची मॅग्नॅटिक शक्ती कमी होण्याचे आणि चुंबकीय ध्रुव सरकण्याचे (काहींच्या मते तो आताच 30 टक्के सरकलाय) परिणाम म्हणजे सूर्यप्रकाशातील नको त्या प्रारणांचा (रेडिएशन) त्रास. ओझोन वायूचे कवच विरळ होणे आणि पक्षी, कासव किंवा अनेक जलचरांना नैसर्गिक प्रेरणेने (या चुंबकीय ध्रुवामुळे) होणारे दिशादर्शन यात गडबड होऊ शकते. आणि कदाचित ध्रुवीय प्रदेशात दिसणारे नयनरम्य ‘अरोरा’ किंवा ध्रुवीय प्रकाश दिसणार नाहीत. त्याविषयी नंतर केव्हा तरी.
























































