
कोरोनाच्या उपायोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे काढले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या एक हजार बेडस कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या एक हजार खाटांचे कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी मान्यवर सहभागी झाले होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत. याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे.
मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत एक हजार खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयुची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधानांशी संवाद साधताना देऊत अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.


























































