आगळं वेगळं – दमलेल्या बाबाची कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संदीप खरे
>>  शब्दांकन – अवंती कारखानीस

आई नेहमीच व्यक्त होत असते; मात्र वडील तसे व्यक्त होत नसले तरी त्याचं प्रेम, माया मात्र तेवढीच उत्कट असते. म्हणूनच ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ आणि ‘दूरदेशी गेला बाबा’ या काळजाला भिडणाऱया गाण्यांना अतुलनीय प्रतिसाद लाभतो. ही गाणी रचणारे गीतकार-कवी संदीप खरे यांनी ‘फादर्स डे’निमित्त या गाण्यातून व्यक्त होणाऱया भावना मांडल्या आहेत.

वडील हे मुलीची अव्यक्त आईच असतात. आई नेहमीच व्यक्त होत असते; मात्र वडील तेवढय़ाच उत्कटतेने व्यक्त होत नाहीत. तरीही वडिलांच्या मनातील तीव्रता मात्र तेवढीच असते. कदाचित, दोघांचे व्यक्त होण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. बाबाचं आणि मुलीचं हे खूप वेगळं नातं आहे. वडिलांना आईसारखी जवळीक मिळू शकत नाही. आपल्याकडे नेहमी असं बोललं जातं की, मुलाचं जीव लावणं हे वेगळय़ा प्रकारचं असतं, तर मुलीचं जीव लावणं हे अधिक लाघवी असतं. तिची माया वेगळी असते. यानुसारच वडिलांचं आपल्या मुलीशी असणारं नातं वेगवेगळय़ा रूपामध्ये व्यक्त होत असतं. बाबा हा कधी तिचा मित्र असतो, फिलॉसॉफर असतो; तर कधी मार्गदर्शक असतो. वेगवेगळय़ा प्रसंगांनुसार तो वेगवेगळी भूमिका साकारत असतो.

माझी मुलगी रुमानी हिचा जन्म झाल्यानंतर लगेचच ‘बाबा’पणाची जाणीव मनात निर्माण झाली होती. कारण ती भावना निर्माण होण्यासाठी सहवास महत्त्वाचा असतो. पहिलं मूल होतं तेव्हा आपण नुकतंच कॉलेजविश्वातून, तरुणपणातून बाहेर आलेलो असतो. त्यामुळेच ही जबाबदारी झेपेपर्यंत काही काळ नक्कीच जावा लागतो. हृदयापर्यंत वडिलकीची भावना पोचायला वेळ लागतो. काळ जातो तसे तुम्ही मोठे होता आणि मग नात्यांचे नवे बंध उलगडू लागतात. रुमानीसुद्धा सुरुवातीच्या काळात आईकडेच जास्त असायची. ती जशी बोलायला लागली तशी तिच्या बोबडय़ा शब्दांतून ती व्यक्त होऊ लागली आणि मग आमची जवळीक अधिक वाढत गेली. तिला गोष्टी सांगणं, तिच्या बोबडय़ा बोलात संवाद साधणं या गोष्टी आपोआपच होत गेल्या.

‘आयुष्यावर बोलू काही’चा पाचशेवा प्रयोग होता तेव्हा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणं गाताना रुमा खुर्चीत बसून रडत होती हे बऱयाच जणांनी टीव्हीवर पाहिलं असेल. रुमानीही माझ्या आणि सोनियासारखी खूप संवेदनशील आहे. ‘दूरदेशी गेला बाबा’ या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला हे खरं असलं तरी याला दुसरी बाजूही आहे. हे गाणं ऐकताना बऱयाच पालकांना खूप वाईट वाटायचं. काहींनी तर मला सांगितलं की, हे गाणं ऐकून आम्ही नोकरी सोडली. अर्थात, गाणं लिहिताना मला अशी प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित नव्हती. कारण मुलांपासून दूर राहणं हे कोणताही बाबा आनंदानं करत नाही. तो नाइलाजास्तव किंवा आजच्या काळाची ती गरज आहे असं आपण म्हणू शकतो. बाबा मुलांपासून दूर असला तरी त्याचं प्रेम, माया मात्र तेवढीच उत्कट असते.

‘दमलेल्या बाबाची’ हे गाणं कसं सुचलं, असं अनेकजण मला विचारतात. माझ्या आणि सलीलच्या बाबतीत या गाण्यातील अनुभव अनेकदा येतो. ‘आयुष्यावर बोलू काही’च्या 500व्या प्रयोगात आम्ही ही कविता पहिल्यांदा सादर केली. तो एक प्रयोगच होता; परंतु आमचा प्रयत्न प्रामाणिक असल्यामुळे प्रेक्षकांची दाद मिळाली. हे गाणं ऐकताना अनेकांच्या डोळय़ांना रुमाल लागतात. खरं तर कोणत्याही कवितेला विशिष्ट वयोगट नसतो. प्रामाणिक प्रयत्न केला तर त्याला प्रतिसाद नक्कीच मिळतो. कविता म्हणजे एक उद्गार असतो. उत्स्फूर्तता असते. चांगल्या बालकविता मोठी माणसंही ऐकतातच. आपले अनुभवही साचेबंद नसतात. तसंच कवितेचंही असतं. वैविध्यपूर्णता महत्त्वाची असते. आणि माझं तर जगण्यावर खूपच प्रेम आहे. त्यातील वैविध्यपूर्णता मी टिपत जातो. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्याला पत्र, फोन आणि प्रत्यक्ष भेटून लोकांनी इतक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत की, त्याचं एखादं पुस्तक तयार होईल. यामध्ये चार वर्षांच्या मुलांपासून आजीबाईंपर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया आहेत. याचं कारण ही ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ प्रत्येकाच्या घरातली आहे.

‘फादर्स डे’निमित्त मी मुलांना एवढेच सांगू इच्छितो की, एखाद्याचे बाबा कामानिमित्त बाहेर असतील तर त्यांना आवर्जून या दिवशी फोन करा. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांचं प्रेम आणि त्यांची माया ते दूर असले तरीही तुम्हाला नक्कीच जाणवेल.