
यंदा कराडमध्ये विभागात वळीवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. 2 जूननंतर दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी भुईमूग, तांदूळ, सोयाबीन, मका या पिकांची सुमारे 80 टक्के पेरणी पूर्ण केली आहे. दोन तीन दिवसाच्या पावसाच्या उघडीपीच्या काळात ही पेरणी झाली. त्यानंतर पुन्हा सलग 4 ते 5 दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पीके उगवण्यास पोषक वातावरण तयार झाले. 4-5 दिवस सलग पाऊस पडल्यानंतर शनिवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शिवारात कोळपणीची लगबग सुरू आहे. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे त्यांनी देखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड करत आहेत.
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी. परंतू सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पीकामध्ये कोळपणी करू शकतो. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने लोक पीके कोळपत असल्याचे दिसत आहे. सध्या पीके कोळपण्यासाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपल्यामुळे पुढे मोठया प्रमाणात येणाऱ्या गवताला प्रतिबंध घालता येतो. ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर सध्या कोळपणीची एकच धांदल चालू असल्याचे दिसून येत आहे.
कराड-पाटण विभागात जास्त पाऊस असतो. त्यामुळे बहुतांशी तांदळाचे पीक घेतात. हे पीक करताना लावणीची पध्दत वापरली जाते. लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी बी टाकले जाते. त्यानंतर संबंधित वावरामध्ये नांगरले जाते. हे सुध्दा काम सध्या सुरु आहे. लावणीच्या पध्दतीमुळे शेतातील गवत कमी होते तसेच पीकाचे उत्पादन जास्त येते. यामुळे अशा पध्दतीचे नांगरण्याचे काम सुध्दा मोठया प्रमाणात सुरु आहे. एकंदरित संपूर्ण शिवारात कामाती लगबग आहे. पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे सर्व लोक कामात व्यस्त आहेत.




























































