कोरोना संकटात प्राणायाम वाढवेल रोगप्रतिकारक शक्ती, ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’निमित्त पंतप्रधान मोदींचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना विषाणू आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी श्वसनसंस्था सुदृढ करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी फायदेशीर ठरतो तो प्राणायाम. श्वसनाचे प्राणायाम केले पाहिजेत. प्राणायामाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यासाठी योगाला आपल्या आयुष्याचा भाग बनवा’, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’निमित्त राष्ट्राला दिला.

कोरोना संकटामुळे यंदाचा योग दिन हा डिजिटल झाला. देशातच नव्हे, तर जगातील नागरिकांनी घरीच आपल्या कुटुंबासोबत योगा करून हा दिन साजरा केला. पंतप्रधान मोदी यांनी त्यानिमित्त योगाचे महत्त्व विषद केले. ‘योग दिन हा विश्वबंधुत्वाचा दिवस आहे. जो सर्वांना जोडतो, एकत्र आणतो, अंतर कमी करतो तोच खरा योग आहे. योगामधील प्राणायाम आपली प्रकृती सुदृढ ठेवण्यास मदत करतो. अनुलोम, विलोम या प्राणायामाच्या लोकप्रिय पद्धती आहेत. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची योगासने फायदेशीर आहेत’ असे ते म्हणाले.
जगातील कोरोनाग्रस्त नागरिकांना योगामुळे फायदा होत आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाशी लढण्याचे सामर्थ्य निर्माण होत आहे. योगा हा आपल्या शारीरिक मजबुती देतो आणि मनःशांतीही देतो. घरामध्ये कुटुंबीयांसोबत योग करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. योगामुळे सर्व एकत्र येतात तेव्हा संपूर्ण घरामध्ये ऊर्जेचा संचार होतो. योग हा भेदभाव करत नाही. प्रत्येक जण योग करू शकतो.’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘घरामध्ये योगा, कुटुंबासोबत योगा’ अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना होती.