
लॉकडाऊनमुळे लाखो मजूर बेघर झाले. शेकडो कारखाने बंद पडले. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. डॉक्टर होण्याचे स्वप्न बघत असलेल्या एका तरुणावर सध्या परिस्थितीमुळे कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
ही दुर्दैवी कहाणी आहे दिल्लीच्या सीलमपूर येथील 20 वर्षीय चांद मोहम्मदची. बारावीत शिकत असलेल्या चांदचे भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. पण परिस्थितीतमुळे सध्या तो स्मशानात काम करत आहे. आपल्या परिस्थितीबाबत चांद म्हणाला, लॉकडाऊनमध्ये माझ्या मोठय़ा भावाची नोकरी गेली. आमच्या पुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुरुवातीच्या काळात आमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला मदत केली. पण ते तरी किती मदत करणार? शेवटी मीच दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालो. सध्या माझ्यावर कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आहे.
परिवारासाठी स्वीकारले आव्हान
माझ्याकडे कोणता मार्ग नसल्याने मी ही नोकरी स्वीकारली आहे. या नोकरीत मला संसर्गाचा धोका आहे. पण आईवडील, तीन बहिणी आणि दोन भावांचा सांभाळ करण्यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारण्याची चांदने सांगितले. प्रत्येक दिवशी मला दोन ते तीन शवांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. पीपीई किट घालून काम करताना आम्ही अक्षरशः घामाने आंघोळ करतो, असेही तो म्हणाला.

























































