‘सील’ केलेल्या भागात चारपैकी तीन रस्ते बंद; कोरोना रोखण्यासाठी उत्तर मुंबईत कठोर अंमलबजावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली आणि कांदिवली भागात प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘सील’ केलेल्या भागात चारपैकी फक्त एकाच रस्त्यावर रहदारी सुरू ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एक रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे. परिमंडळ – 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी ही माहिती दिली.

पालिकेच्या परिमंडळ – 7 मध्ये आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर या तीन विभागांचा समावेश होतो. या भागात वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘चेसिंग द व्हायरस’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीने प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातील आर दक्षिण म्हणजेच कांदिवली विभागात आतापर्यंत 1965 रुग्ण आढळले असून यातील 730 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आर मध्य म्हणजेच बोरिवलीत 1781 रुग्ण आढळले असून यातील 766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आणि आर उत्तर म्हणजेच दहिसर विभागात 1781 रुग्ण आढळले असून 443 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सर्वात कमी म्हणजेच 19 ते 20 दिवस आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कंटेनमेंंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शौचालयांचे सहा वेळा सॅनिटायझेशन
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रभावी काम केले जात आहे. या भागात झोपडपट्टी भाग जास्त असल्याने सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून सहा वेळा सॅनिटायझेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याआधी दिवसातून तीन वेळाच सॅनिटायझेशन करण्यात येत होते.

मुलुंड, भांडूपमध्येही प्रभावी अंमलबजावणी
उत्तर मुंबईप्रमाणे मुलुंड, भांडूपमधील कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय रुग्णांचा घरोघरी जाऊन शोध घेणे, क्लोज काँटॅक्टचे प्रभावी क्वारेंटाइन करणे आणि निर्जंतुकीकरण या प्रभावीपणे काम करीत असल्याची माहिती टी विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी दिली. दरम्यान, नियम मोडणार्‍यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीही पहारा आणि गस्त वाढवली आहे.

जुलैमध्ये कोरोना पूर्णपणे नियंत्रणात!
मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवसांवर पोहोचला असून जुलैच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल असा ठाम विश्वास पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज व्यक्त केला. मुंबईत सुरुवातील हॉटस्पॉट ठरलेले वरळी, धारावी, भायखळा, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी हे विभाग आता पूर्णपणे नियंत्रणात आले आहेत. मुंबईत मागील एका महिन्यात एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जगात हे उदाहरण अन्यत्र कुठेही नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाची लक्षणे असलेल्यांनाच रुग्णालयात ‘बेड’ मिळणार!
कोरोनाची लक्षणे असणाऱया रुग्णांनाच रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करुन द्यावेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत ‘बेड’ मिळावा, याकरिता सर्व परिमंडळीय सहआयुक्त/उपायुक्त आणि विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांची तपासणी करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले. कोरोना रुग्णांची संख्या अधिक असणाऱया मालाड प्रतिबंधित क्षेत्राचा आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आज पाहणी दौरा केला.