कोल्हापूरात कोरोनाचा नववा बळी; आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 9 वर पोहचली आहे.

कोल्हापूरातील कणेरकर नगर येथील 62 वर्षीय कोरोनाबाधित सराफाचा गुरुवारी दुपारी मृत्यु झाला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील पहिला तर जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेला हा नववा मृत्यू आहे. मृत सराफाचा मुलगाही कोरोनाबाधित आढळला आहे. तर शेजाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर परिसरातील गुजरी येथेही त्यांचा व्यावसायिक वावर असल्याचे समोर आल्याने, हा परिसरही सील करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. त्यात आजरा-1, गडहिंग्लज आणि शाहुवाडी तालुक्यात प्रत्येकी 2 तर महानगरपालिका क्षेत्रात 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. 6 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 765 झाली आहे. तर आतापर्यंत आजरा-2, गडहिंग्लज-3, पन्हाळा, शाहुवाडी प्रत्येकी 1 इंचलकरंजी-1 आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील अशा एकूण 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.