
अमरावतीत आज कोरोनाच्या अहवालात एकूण नवे 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 472 झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे उपचारानंतर सुटी झालेल्या रुग्णांची संख्या 321 झाली असून, त्याची टक्केवारी 70 आहे. ही बाब दिलासादायक आहे.
गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार बडनेरा येथील 29 वर्षीय महिला व मोर्शी तालूक्यातील विचोरी येथील 45 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता आलेल्या अहवालात साबनपुरा येथील 52 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. सायंकाळी 4.30 वाजता आलेल्या अहवालात पुन्हा 9 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहे.
मोर्शी तालूक्यात असलेल्या दापूरी येथील महिला, रोहनखेड येथील महिला कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली होती. दापूरी येथील सदर महिला 12 जून रोजी कोरोनाग्रस्त महिलेच्या घरी एका सोहळयानिमित्त्ताने बांगड्या भरण्यासाठी गेली होती. याची माहिती मिळाल्यानंतर विचोरीच्या या महिलेची तपासणी करण्यात आली.त्यात सदर महिला कोरोनाग्रस्त आढळून आली आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा शहरासोबतच ग्रामीण भागात हळूवारपणे पसरत आहे. त्याचवेळी दवाखान्यातून दुरुस्ती होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यानुसार टक्केवारी 69.78 आहे.




























































