
राजकीय स्तरावरचा प्रश्न असो की अन्य कोणता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेल्यावर त्याचे उत्तर किंवा मार्ग नक्की सापडतो. राज्यातील खासगी बस चालकांच्या प्रश्नावर गेल्या 46 दिवसांपासून परिवहन विभागासोबत चालू असलेल्या चर्चेवर अवघ्या दोन तासांत पवारांनी मार्ग काढला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात टास्क फोर्स नियुक्त करण्याची सूचना त्यांनी केली.
राज्यात नोंदणीकृत बसेसची संख्या एकूण 55 हजार आहे, तर एकटय़ा मुंबई महानगर प्रदेशात 38 हजार बसेस आहेत. कोरोनामुळे बस व्यावसायिकांची महिन्याला 700 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यासंदर्भात 8 मे रोजी परिवहन विभागाला पत्र लिहून व्यावसायिकांनी आपल्या मागण्या मांडल्या; पण परिवहन विभागाने या बस चालकांची भेट घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळेच संतापलेल्या बस चालकांनी गुरुवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. अखेरचा प्रयत्न म्हणून या बस व्यावसायिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी या बस व्यावसायिकांना सर्व मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. यासंदर्भात त्यांनी स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली.
बस व्यावसायिकांच्या मागण्या
खासगी बसेसना वाहतुकीची परवानगी द्यावी
बेस्ट डेपो, बीएमसी पार्पिंगमध्ये मोफत जागा
आरटीओला भरावा लागणारा कर माफ करावा
या वर्षासाठी बसेसचे ईएमआय थांबवावे
एक वर्षासाठी टोलमाफी द्यावी
वाहन विम्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवावी
सतत परवाना मागू नये























































