
पर्यटनाच्या विकासासाठी आता समुद्र किनाऱ्यांवर बीच शॅक्स म्हणजेच चौपाटी कुटय़ा उभारण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. रत्नागिरीतील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर, तारकर्ली तर रायगडमधील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्य़ातील केळवा, बोर्डी या आठ किनाऱ्यांवर या कुटय़ा उभारता येणार आहेत. एका किनाऱ्यावर जास्तीत जास्त 10 कुटय़ा उभारता येतील.
किनाऱ्यावर कुटी उभारण्यासाठीचा अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात निर्माण होणाऱया रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील. या कुटय़ांचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल. या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱया वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.


























































