लॉकडाऊनमध्येही मध्य रेल्वेचा फिटनेस कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत लॉकडाऊन शिथील होऊन ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले असले तरी उपनगरीय लोकल सेवा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने आपला फिटनेस कायम राखण्यासाठी कारखान्यांमध्ये डागडुजी सुरू ठेवली आहे. दर 24 महिन्यांतून एकदा मुंबईची लाईफ लाइन लोकलची संपूर्ण डागडुजी करण्यात येऊन तिला नवे स्टेनलेस स्टीलचे पंखे, एलईडी लाईट आणि युवी पेटिंग केले जात असते.

मध्य रेल्वेने लॉकडाऊनमध्ये असलेल्या कमी ट्रफिकचा फायदा उचलत आता आपल्या लोकलना डागडुजीकरीता कारशेडमध्ये पाठवून नवे रंग रूप दिले जात आहे. प्रत्येक लोकल 24 महिन्यांतून एकदा ‘पीओएच’ला पाठविली जात असते. मध्य रेल्वेच्या सानपाडा वर्कशॉपमधून पहिली लोकल डागडुजी होऊन बाहेर पडली आहे. तर परळ वर्कशॉपमधूनदेखील पहिली टॉवर वॅगन पिरिऑडिक ओव्हरहाऊलिंग ‘पीओएच’ होऊन बाहेर पडली आहे. ही डागडुजी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे सारे नियम पाळून केली आहे.

23 मार्चपासून राष्ट्रव्यापी लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेने प्रवासी सेवा बंद असली तरी मालवाहतूक आणि पार्सल वाहतूक सेवा सुरू ठेवली होती. 1 मेपासून रेल्वेने अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक एक्स्प्रेस सुरू केल्या. तर 12 मेपासून राजधानीच्या पंधरा मार्गांवर रेल्वेने 30 स्पेशल एसी गाडय़ा सुरू केल्या. त्यानंतर 1 जूनपासून 200 गाडय़ा सर्वप्रकारच्या प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केल्या आहेत. आणि आता 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरूपात उपनगरीय लोकल सुरू करण्यात आल्या असून मध्य रेल्वे दररोज 200 फेऱ्या चालवित आहे.