बलात्कारानंतर थकल्याने झोपी गेले; पीडितेच्या जबाबावर न्यायाधीशांना आक्षेप; म्हणाले हे तर अनाकलनीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक उच्च न्यायालयात बलात्काराच्या प्रकरणी सुनावणी सुरू असताना पीडितेने नोंदवलेल्या जबाबावरून गोंधळ उडाला. बलात्कारानंतर थकल्याने मी झोपी गेले असे पीडितेने म्हटले. यावर न्यायाधीशांनी आक्षेप नोंदवत बलात्कारानंतर झोपी जाणे हिंदुस्थानी महिलांचे आचरण नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीने एका तरुणावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी आरोपीच्या जामीन अर्जावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान पीडित तरुणीने बलात्कारानंतर थकल्याने मी झोपी गेले असे एका जबाबात म्हटले. यावर जस्टीस कृष्णा एस. दीक्षित यांनी आक्षेप नोंदवला.

पीडितेच्या आरोपांवर संशय व्यक्त करत न्यायालयाने याचिकाकर्त्याला 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि काही अटी शर्थीसह जमीन मंजूर केला. न्यायमूर्ती यांनी फिर्यादीच्या बलात्कारानंतर झोपी गेले या विधानावर असहमती दर्शवली. हे अनाकलनीय असून हिंदुस्थानमध्ये बलात्कारानंतर महिला अशा प्रकारचे आचरण ठेवत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

पीडिता कथित बलात्काराच्या दिवशी रात्री 11 वाजता ऑफिसला का गेली होती? आणि आरोपीसोबत बिनदिक्कत दारू कशी प्यायली? याबाबत पुरेसे स्पष्टीकरण देऊ शकली नाही. त्यामुळे. न्यायालयाने आरोपीला सहा अटी शर्थीसह जामीन दिला असून यातील एकही अट मोडल्यास त्याचा जामीन रद्द केला जाईल.