धारावीत डबलिंग रेट 140 दिवसांवर! पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा दररोजचा आकडा 10च्या खाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखली जाणारा धारावी परिसर आता मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी असलेला भाग म्हणून ओळखला जात आहे. सध्या धारावीचा डबलिंग रेट आता 140 दिवसांवर जाऊन पोहोचला असून ग्रोथ रेट 0.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दरदिवशीची संख्याही गेले आठवडाभर 10च्या खाली आहे.

पालिका आणि राज्य सरकारच्या सर्वातोपरी उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून काही विभागांमध्ये डबलिंग रेटचे प्रमाण हे 70 ते ९० दिवसांपर्यंत आले आहे. यात एच/पूर्वमधील वांद्रे, खारच्या पूर्व परिसरात कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण 97 दिवसांवर पोहोचले आहे. इतर परिसरातही डबलिंग रेट हा 40 दिवसांच्या पुढेच आहे. मात्र, या सर्वात धारावीने बाजी मारली आहे. जी/उत्तर विभागात येणाऱ्या धारावीत डबलिंग रेट हा 140 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मात्र, दादर, माहीम आणि धारावी मिळून बनलेल्या जी/उत्तर प्रभागाचा डबलिंग रेट हा 58 दिवस इतका आहे. धारावीत आतापर्यंत 2 हजार 218 रुग्ण सापडले असून हजारहून जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत तर आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांसाठी तीन कोरोना सेंटर्स

पोलीस आणि त्यांच्या कुटुंंबीयांसाठी कालिना, मरिन ड्राईव्ह आणि अंधेरीतील मरोळ येथे तीन कोरोना सेंटर्स उभारण्यात आली असून त्यात एकूण 1 हजार बेडची व्यवस्था आहे. एका रूममध्ये चार बेड असून तिथे खेळ आणि मनोरंजनासाठी कॅरम, बुुद्धिबळ, ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलाच्या 117 जवानांना याची लागण झाली असून 80 जण कोरोनामुक्त झाले तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.