लेख – चीनविरुद्ध एकत्र मुकाबला हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

हिंदुस्थानचे काही कॉर्पोरेट वर्ल्ड चीनवर अतिशय अवलंबून आहे. त्यांना चीनवरची अवलंबिता कमी करावी लागणार आहे. त्याला वेळ लागेल, परंतु निश्चय केला तर नक्कीच हिंदुस्थानची जीत होईल. हिंदुस्थानचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर जर हे हिंदुस्थानींना आपला नंबर एक शत्रू चीन आहे कळत नसेल तर यापेक्षा दुसरे कुठलेही मोठे दुर्दैव असू शकत नाही. आशा करूया की आपण एकत्रितरित्या चीनविरुद्ध मुकाबला करू.

देश सध्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर जोर देत आहे. त्याआधी ‘व्होकल फॉर लोकल’ असा नारा दिला गेला होता. स्थानिक वस्तूंचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हिंदुस्थानींनी सक्रिय व्हावे, असा हा संदेश आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा अर्थ आहे की हिंदुस्थानने दुसऱया देशांवरील आपली निर्भरता कमीत कमी करावी. जी वस्तू आयात करण्यास आम्ही विवश आहोत ती हिंदुस्थानातच कशी निर्माण होईल, भविष्यात याच वस्तूंचा हिंदुस्थान निर्यातदार कसा बनेल या दिशेने आपल्याला अधिक वेगाने कार्य करायचे आहे.

हिंदुस्थानला केवळ भौतिक वस्तूंबाबत स्वावलंबी व त्यांचे निर्यातदार बनून थांबणार नाही. त्याला हिंदुस्थानी संकल्पनांचीही निर्यात करावी लागणार आहे. ज्याला ‘सॉफ्ट पॉवर’ म्हटले जाते. म्हणून हिंदुस्थानने भौतिक वस्तुंशिवाय आपली ‘सॉफ्ट पॉवर’ निर्यात करण्यास सक्षम होणे हे अभिप्रेत आहे. ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेले असते, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. कुठल्याही समस्या वा उपायांवर पॅकेज मागणे, हा हक्क मानला जाऊ लागतो. पण, ते आणायचे कुठून व कसे, यावर देशाकडे फारसे पर्याय, उपलब्द नाहीत.

500 श्रेणीतील वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

देशाचं लक्ष पूर्व लडाखमधील गलवान खोऱयातील लष्करी घडामोडींकडे लागलेले असताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ‘कैटनं’ चीनला व्यापारातून उत्तर देणारा निर्णय घेतला आहे. लडाखच्या पार्श्वभूमीवर कैटनं मेड इन चायना 500 श्रेणीतील वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंची यादीही कैटनं निश्चित केली आहे. संधी मिळेल तेव्हा चीन हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून व्यापारी महासंघाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या अभियानातंर्गत बहिष्कार टाकण्यात येणाऱया मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे.

सध्या चीनमधून हिंदुस्थानातील वार्षिक आयात 5.25 लाख कोटी रुपयांची आहे. महासंघाने पहिल्या टप्प्यात 3000 वस्तूंची निवड केली आहे. या वस्तू हिंदुस्थानही तयार होतात, मात्र स्वस्त मिळत असल्याने आतापर्यंत चीनमधून आयात केल्या जातात. या वस्तू तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज नाही. त्यामुळे चिनी वस्तूंऐवजी हिंदुस्थानात तयार करण्यात आलेल्या वस्तूंचा उपयोग सहजपणे केला जाऊ शकतो. त्यातून हिंदुस्थानचे चीनवरील अवलंबून राहणे मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकते.

कोणत्या वस्तूंवर टाकला बहिष्कार?

महासंघाने बहिष्कार टाकलेल्या वस्तूंमध्ये दैनंदिन कामात वापरल्या जाणाऱया वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, कापड (टेक्सटाइल), बांधकामासाठी लागणारे साहित्य, फुटवेअर, गार्मेंटस, स्वयंपाक घरात वापरात येणारे सामान, हॅण्ड बॅग, कॉस्मेटिक, भेट म्हणून दिल्या जाणाऱया वस्तू, इलेक्ट्रिकल्स व इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यान्न, घडय़ाळ, ज्वेलरी, स्टेशनरी साहित्य, कागद, घरात वापरल्या जाणाऱया वस्तू, फर्निचर, लायटिंग, आरोग्यासंबंधी वापरल्या जाणाऱया वस्तू, पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य, ऑटोपार्टस, दिवाळी व होळी या सणाच्या काळात विकल्या जाणाऱया वस्तू, चष्मे अशा 500 प्रकारच्या श्रेणीतील 3000 वस्तूंचा समावेश आहे.

चीनच्या वस्तूंवर हिंदुस्थानात बहिष्कार टाकला जाणे शक्य नाही. कारण, या वस्तू हिंदुस्थानींच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, ज्यांची जागा दुसऱया वस्तूंनी घेणे कठीण आहे, असे चीनच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये विश्लेषकांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. हिंदुस्थानातील चीनविरोधी भावना देशभक्तांनी पुढे आणली आहे आणि हा चीनचे नाव खराब करण्याचा डाव आहे. चीनच्या वस्तूंना पर्याय म्हणून असलेल्या टीव्ही 10 ते 15 टक्के महाग आहेत. हिंदुस्थान आणि चीनचा व्यापारही 2019 या वर्षात 93 बिलियन एवढा आहे.

सामान्य नागरिक आपली जबाबदारी उचलू शकतात

जागतिक स्तरावरील करारामुळे बहिष्कार/बंदी अशा भूमिका शासकीय स्तरावर घेता येणार नाहीत, तरी जनमानसात आत्मनिर्भरतेची मोहीम जोमाने राबवून सामान्य नागरिक आपली जबाबदारी उचलू शकतात. चिनी वस्तू विकत घेतली नाही तरी ते पुरेसे आहे. आजच्या काळातील युद्धे विविध स्तरावर लढली जातात, यामध्ये देशांमधील जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो.

आयातीवर बंदी घालण्याच्या मार्गात आंतरराष्ट्रीय करार आडवे येतीलही, पण तो माल विकत घेणे न घेणे, आपल्या दुकानात विक्रीसाठी न मांडणे, हे व्यापाऱयांच्या हाती आहे. चिनी माल खरेदी न करणे, हा हुकमाचा पत्ता ग्राहकाच्या हाती आहे. त्याला जागृत करण्याचे जनआंदोलन तीव्र करणे, हे तर आपल्यासारख्या सामान्यांच्याच हाती आहे.

चीन आपल्या वस्तू हिंदुस्थानात विकून प्रचंड नफा कमवितो. त्यामुळे त्यांची आर्थिक ताकत वाढते. ही आर्थिक ताकत चीन लष्कर बलाढय़ करण्यास वापरतो. म्हणजे हिंदुस्थानात कमावलेल्या पैशांचा वापर करून चिनी सैन्य हिंदुस्थानला त्रास देते. त्यामुळे हिंदुस्थानींनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायलाच हवा.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून कोरोनाचा हिंदुस्थानमध्ये प्रसार सुरू झाला. हे चीनने जगाविरुद्ध आणि हिंदुस्थानविरुद्ध लादलेले तिसरे महायुद्ध होते. यामुळे जगाच्या आणि हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचे एवढे नुकसान झाले की ते या आधीच्या सगळ्या युद्धांना एकत्रित करून झालेल्या नुकसानापेक्षा कितीतरी जास्त आहे. लडाखमध्ये चिनी आक्रमकता बघितल्यानंतर सुद्धा अनेक हिंदुस्थानी अजून सुद्धा चिनी वस्तू स्वस्त मिळतात म्हणून बहिष्कार घालायला तयार नाहीत. जोपर्यंत 130 कोटी हिंदुस्थानी एकत्र येऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार घालत नाहीत तोपर्यंत त्याला पुरेसे यश मिळणार नाही.