
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लगबग सुरू झाल्यानंतर आता घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची लगीनघाई सुरु झाली आहे. आपल्या आवडत्या बाप्पांच्या निवडीसाठी अनेकांनी लालबाग, परळ आणि पश्चिम उपनगरातील मुर्तीकारांच्या चित्रशाळकडे पावलं वळविली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश चित्रशाळांसाठी स्थानिक प्रशासनाकडून अद्याप नियमावली जाहीर न केल्याने मूर्तिकार चित्रशाळांच्या श्रीगणेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे कळते. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील अनेक मूर्तिकारांनी लवकरात लवकर चित्रशाळांसाठी नियमावली जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे.
मुंबईत दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर घरगुती गणेशोत्सवाचादेखील आनंदोत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेशोत्सवदेखील नियमांच्या चौकटीत आला आहे. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाची निर्मिती करणाऱ्या मूर्तिकारांचे लक्षदेखील सरकारच्या नियमावलीकडे लागून राहिले आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्यासाठी फार कमी वेळ मूर्तिकारांकडे शिल्लक असल्याने चित्रशाळेच्या परवानगीसाठी स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली आहे. मात्र अद्याप स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची नियमावली तयार न झाल्याने गणेश मूर्तीकारांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची माहिती मुंबईतील अनेक मुर्तिकारांकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांताक्रुझ परिसरात गणेशचित्रशाळा उभारणारे मुर्तीकार सिद्धश पांढरकामे म्हणाले की, यंदा मुर्तिकारांसमोर संभ्रमावस्था पसरली आहे. उत्सवाला दोन महिने शिल्लक असताना अद्याप आम्हांला परवानगी मिळालेली नसल्याने चित्रशाळा उभारु शकत नाही. दरवर्षी मे महिन्यात आमच्याकडे कार्यशाळेस सुरुवात होते. पण यंदा अद्याप नियमावली नसल्याने मूर्तिशाळा सुरु करू शकलेलो नाही. अनेक घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी यंदा चार ते पाच दिवस अगोदर मूर्ती नेण्याची तयारीदेखील दर्शविली आहे. अनेकांनी फोनवरुनच ऑर्डर दिली आहे. मात्र त्यानंतरही अद्याप कार्यशाळाच सुरु न झाल्याने आमच्यासमोर कमी वेळेत मूर्तीची निर्मिती करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
मंडपासाठी कामगार मिळेना
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा संख्येने मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे चित्रशाळेसाठी लागणाऱ्या मंडपाची उभारणी करण्याचे मोठे आवाहन मूर्तिकारांसमोर आहे. कारखाना उभा करण्यासाठी डेकोरेटर्सलाही कामगार मिळत नसल्याची माहिती सिद्धेश पांढरकामे यांनी दिली.
तर मूर्ती घरपोच पाठविणार
सध्याची परिस्थिती लक्षात घेता फार कमी गणेशभक्त मूर्तीकारांच्या चित्रशाळेपर्यंत पोहचविणार आहेत. तर गणेशोत्सवाच्या दरम्यान मोठया संख्येने कार्यशाळेत गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक गणेशमूर्तीकारांनी गणेशमूर्तीच गणेशभक्तांच्या घरपोच पोचविण्यासाठी तयारी सुरू केली असून राज्य सरकारच्या नियमानंतर यापुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती लालबाग मधील अनेक मुर्तिकारांनी दिली.
बैठकांचे फार्स सुरू
गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीकारांकडे गर्दी होऊ नये यासाठी सध्या स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांच्या पातळीवर बैठका घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यात प्रामुख्याने नेहमी होणारी गर्दी आणि त्यावर गर्दीचे नियंत्रण कसे करता येईल, यासाठी आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
जागा निश्चित नाही
दरवर्षी गणेशमूर्तींची चित्रशाळा साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस सुरुवात होते. त्यानंतर त्यात जागा निश्चिती करुन वाहतुक पोलिसांची परवानगी आणि इतर परवानगी घेऊन जागा निश्चित केली जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन आले आहे. त्यामुळे नव्या जागांची शोधाशोध सुरु आहे. परिणामी जागा निश्चितीसाठी तरी नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी मूर्तिकारांकडून होऊ लागली आहे.


























































