
सोशल मीडियावर कालपासून चर्चा आहे ती एका पोस्टर आणि व्हिडीयो क्लिपची. शुभारंभाचा प्रयोग… तुमच्या आवडत्या नाट्यगृहात… रविवार, 12 जुलै 2020 रोजी. या पोस्टरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाटक सुरू होणार ही सुखावणारी गोष्ट असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्न रसिकांच्या मनात उभे केले आहेत.
हे नाटक नेमके कोणते आहे? ते कोण दिग्दर्शित वरत आहे? त्यातील कलाकार कोण? प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे? लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली? प्रयोगाला येणाऱया रसिकांच्या सुरक्षिततेचे काय? तसेच ऑनलाइन नाटक रसिकांना पाहण्यास मिळेल का? असे अनेक प्रश्न मराठी नाट्यरसिकांना पडले आहेत.
रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. आता तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहिले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे, असे या पोस्टबद्दल नाट्यकलाकारांकडून सांगण्यात येत आहे.
‘शुभारंभाचा प्रयोग’ ची पोस्ट अभिनेता ऋषिकेश जोशी आणि स्पृहा जोशी यांनी शेअर केलंय. त्यामुळे ते नाटकांत असणार का याबद्दलही चर्चा रंगतेय.
























































