
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तीन महिने धूळ खात असलेल्या गाड्या चालवण्यापूर्वी त्यांची योग्य ती सर्व्हिसिंग करा. सर्व्हिसिंग न करता गाडी सुरू केल्यास गाडी पेट घेऊ शकते. त्यामुळे सर्व्हिसिंग केल्यानंतरच गाड्या रस्त्यावर आणा आणि अपघात टाळा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना केले आहे.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेले लॉकडाऊन आता काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मुंबईकरांसह वाहनेही मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र, अनेक दिवस बंद असलेली वाहने धोकादायक ठरू शकतात, अपघाताला कारणीभूत ठरू शकतात, असे आढळले आहे.
उषाकिरण इमारतीतील गाडी पेटली
काही दिवसांपूर्वी नाना चौक परिसरात असलेल्या उषाकिरण इमारतीत गाडी पेटल्याची घटना घडली होती. गाडीचा मालक गाडी घेऊन बाहेर गेला होता. परत आल्यानंतर तो गाडी पार्क करत असतानाच तिच्या इंजिनातून धूर येऊ लागला. त्याने कसेतरी करून इंजिन बंद केले. मात्र, इंजिनसह गाडी क्षणार्घात पेटली. याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यावर जवानांनी ती आग विझवली. आगीच्या कारणांचा शोध घेतल्यावर ही गाडी तीन महिने बंद होती. त्यामुळे या गाडीच्या इंजिनमधील इलेक्ट्रिक सर्किट खराब झाले होते. गाडी सुरू झाल्यानंतर सर्किटचा स्पार्क झाला आणि गाडी पेटली. गाडी सॅनिटाईज करण्यात आली नव्हती आणि या गाडीत सॅनिटायझरही आढळले नाही, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी, गाडी चालवण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तिची रितसर सर्व्हिसिंग करा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी केले आहे.






























































