
चित्रपटांच्या शुटिंगला अजून म्हणावी तशी सुरुवात झाली नसली तरी रिकाम्या वेळेत कलाकार आपल्या आगामी चित्रपटामधील व्यक्तिरेखेची तयारी करीत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणनेदेखील सध्या आपल्या शकुन बत्राच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी कंबर कसली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने आपल्या दिवसातील काही वेळ शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी राखून ठेवला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर ती याच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
लॉकडाऊन नसता तर तिने श्रीलंकेमध्ये या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले असते. दीपिकाने या आधीदेखील शकुन बत्रा यांच्या सोबत काम केले आहे.त्यामुळे ती त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत देखील फार उत्सुक आहे.
दीपिकाने वेळोवेळी अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखांना पडद्यावर जीवंत केले आहे. ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. मग ते नैना, केरोनिका, पद्मावती असो किंवा लीला. दीपिका सेटवर परतायला जेवढी उत्सुक आहे, तेवढेच प्रेक्षकदेखील तिला पडद्यावर पाहायला उत्सुक आहेत.




























































