
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 903 नवे रुग्ण सापडले असून ३६ जणांचा मृत्यू झाला तर गेल्या 24 तासांत 625 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 44 हजार 170 वर पोहोचली आहे.
मुंबईतील एकूण मृतांच्या आकडेवारीत प्रलंबित 57 अहवालांचाही समावेश केल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4554 झाली आहे. 67 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण रुग्णांपैकी 57 पुरुष तर 36 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 11 जणांचे वय हे 50 वर्षाखाली होते, 44 जणांचे वय हे 60 वर्षांवर होते तर उर्वरित 38 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. मुंबईत सध्या कोरोनाचे 28 हजार 473 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर हा 57 टक्के इतका आहे. दरम्यान, वांद्रे पूर्व भागांत रुग्ण वाढीचा सरासरी प्रमाण हे अर्धा टक्के असून रुग्ण वाढीचा दर 133 दिवसांवर गेला आहे.
































































