
मध्य रेल्वेने सोमवार 15 जूनपासून अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी राज्य सरकारच्या मागणीवरून उपनगरीय लोकल सेवा सुरू केल्या खर्या परंतू ज्या स्थानकांवर सर्वाधिक रूग्णालये आहेत, त्या धीम्या मार्गाच्या परळ स्थानकांवर अशा लोकलना थांबाच नसल्याने त्या हॉस्पिटल स्टाफसाठी बिन कामाच्या ठरत आहेत. पश्चिम रेल्वेने मात्र 29 जूनपासून काही धिम्या मार्गाच्या लोकलचा वेळापत्रकात समावेश केल्याने प्रभादेवी स्थानकांवर थांबा मिळण्याची सोय झाली आहे.
‘अनलॉक 1.0’ सुरू करताना सरकारी आणि खाजगी कार्यालयांना 10 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थित सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. सरकारी अत्यावश्यक कर्मचारी तसेच खाजगी आरोग्य सेवेतील कर्मचार्यांसाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने 15 जूनपासून मर्यादित स्वरूपात लोकल फेर्या सुरू केल्या आहेत. परंतू या लोकलना केवळ जलद मार्गाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला होता. पश्चिम रेल्वेने 29 जूनपासून काही धिम्या लोकलही सुरू केल्याने प्रभादेवी स्थानकावर आपोआपच थांबा मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परळला थांबा मिळणे गरजेचे होते
खरे पाहिले तर दादर स्थानकावर थांबा देण्यापेक्षा या गाड्यांना परळ स्थानकांतच थांबा देणे गरजेचे होते. कारण परळ स्थानकातून सरकारी, पालिकेची आणि ट्रस्टची हॉस्पिटल जवळ आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या लोकल केवळ जलदच थांबे घेत असल्याने हॉस्पिटलच्या कर्मचार्यांना दादरला उतरून पुन्हा इतर वाहनांनी हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचे विभागीय रेल्वे उपयोगिता सल्लागार समितीचे सदस्य शशिकांत पर्येकर यांनी सांगितले.
‘परे’चा 29 जूनपासून प्रभादेवीला थांबा
पश्चिम रेल्वेने सुरूवातीला 15 जून रोजी 162 फेर्या सुरू केल्या होत्या. तर 29 जूनपासून आणखी 40 फेर्यांची वाढ करीत त्यात 20 फेर्या (10 अप आणि 10डाऊन) धिम्या मार्गावर सुरू केल्याने प्रभादेवी स्थानकावर (एल्फिन्स्टन रोड ) थांबा मिळत आहे.
आधी ‘क्यूआर कोड’ओळखपत्र वाटा
केंद्र सरकारच्या बँक, पोस्ट, कस्टम, सैन्य अधिकारी कर्मचार्यांनाही या अत्यावश्यक लोकल फेर्यांमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी मागणी होत आहे. यावर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. राज्य सरकारने आधी अशा कर्मचार्यांना ‘क्यूआर’ कोड आधारित ओळखपत्रे वाटावीत म्हणजे त्यांची तपासणी दूर उभे राहूनही करणे रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांना सोपे होईल, तसेच अशा केंद्रिय कर्मचार्यांची नेमकी संख्या सांगावी अशा मागण्या मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी केल्या आहेत. त्यावर बैठकांचा जोर सुरू आहे.
वांगणी आणि वासिंदच्या कर्मचार्यांची अडचण
कर्जत मार्गावरील वांगणी आणि कसारा मार्गावरील वासिंद या स्थानकाच्या क्षेत्रात सर्वाधिक वैद्यकीय अत्यावश्यक सेवेतील 300 हून अधिक कर्मचारी ठाणे आणि मुंबईला नोकरीला जातात. मात्र त्यांच्यासाठी लोकल सेवा नसल्याने अडचणी येत असल्याचे कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस राजेश घनघाव यांनी सांगितले.






























































