
देवगडमध्ये जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार 2 ते 8 जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने आठवड्याभराच्या वस्तू भरुन ठेवण्यासाठी बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. मात्र, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक राबवलेल्या धाडसत्रामुळे अनेकांना कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे.
मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे या गोष्टींचे पालन न केल्यामुळे तब्बल अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये 21 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अशी मोहीम सातत्याने सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 2 ते 8 जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व तसेच नागरिकांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने देवगड बाजारपेठेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा गोष्टी होत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.





























































