
हिंदुस्थान-चीन संघर्ष सुरू असतानाच चीनच्या प्रभावाखाली येऊन हिंदुस्थानविरोधात काडय़ा करण्याचा प्रयत्न नेपाळकडून सुरू आहे. स्थानिक नेत्यांच्या मदतीने नेपाळमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न हिंदुस्थान प्रयत्न करत असल्याचा आरोप नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केला होता. यावरून ते स्वतःच अडचणीत आले आहेत. हे आरोप सिद्ध करावेत; अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी केली आहे.
हिंदुस्थानविरोधी वक्तव्यांमुळे पंतप्रधान ओली यांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. बंद दाराआड झालेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत माजी पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, माधव पुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हिंदुस्थान नेपाळमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, दूतावासात आणि हॉटेलमध्ये यासाठी हालचाली सुरू आहेत. नेपाळमधील काही नेतेही यात सहभागी आहेत, असा आरोप ओली यांनी केला होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानी सत्ताधारी पक्षाची एक बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीदरम्यान ओली यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. ओली यांनी हिंदुस्थानबाबत केलेली टीका राजकीयदृष्टय़ा योग्य नव्हती असा सूर या बैठकीत उमटला. हिंदुस्थान दूतावास सरकार पाडण्याचं नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदूताला काढून का टाकत नाही, अशी विचारणा माजी पंतप्रधान भट्टाराय यांनी केली.



























































