बेस्ट बसचा ताफा वाढल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टने अजूनही अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी विरार, पनवेल आणि बदलापूर भागात 150 बसेस अजूनही सुरूच ठेवल्या होत्या. त्या आता दोन दिवसांत पूर्णपणे बंद होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील फिडर रूटसह नियमित बस फेर्‍यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे बसचा ताफा आता तीन हजारापर्यंत गेला आहे.

15 जूनपासून उपनगरीय लोकलच्या फेर्‍या सुरू होताच बेस्टने आपल्या 600 अत्यावश्यक फेर्‍यांपैकी 450 बस बंद केल्या होत्या. तर 150 बसेस येत्या दोन ते तीन दिवसांत बंद होणार आहेत. या बसमधून मुंबईच्या हद्दीबाहेरील अत्यावश्यक सरकारी कर्मचार्‍यांना मोफत प्रवास दिला जात होता. तो आता लोकल सेवा सुरू झाल्याने बेस्टने संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना हळहळू दिलासा मिळणार आहे.

9 लाख प्रवाशांद्वारे 84 लाखांचे उत्पन्न
8 जून रोजी नियमितपणे बसची सेवा सुरु होताच 2,132 बस धावल्या. त्यानंतर 29 जून रोजी 9 लाख 10 हजार प्रवाशांसाठी 2 हजार 948 बस चालवण्यात आल्या. बुधवार 1 जुलै रोजी बेस्टने 3,078 बस फेर्‍या चालवून 9 लाख 7 हजार 471 प्रवाशांना वाहून 84 लाख 53 हजार 802 रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.