विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, गर्दी टाळण्यासाठी होतेय मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱयांची संख्या ही अधिक आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी मुंबईत गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक नितीन डिचोलकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे ही मागणी केली असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळते.

मुंबईत दरवर्षी मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. ज्यात प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी जल्लोषात होणारा हा उत्सव यंदा मात्र साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक सार्वजनिक मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, अनेक मंडळांनी यंदा आपल्या गणेशमूर्तीची उंची कमी करताना कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन करण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबरच घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे देखील गेल्या अनेक वर्षांपासून कृत्रिम तलावात विसर्जन वरीत आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सवासाठी मुंबईत कृत्रिम तलावाची संख्या वाढविण्याची मागणी शिवसेनेचे विलेपार्ले मतदारसंघाचे समन्वयक नितीन डिचोलकर यांनी केले आहे.

सार्वजनिक मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निश्चित केल्याने गर्दी होण्याची शक्यता
मुंबईत अडीच लाखांहून अधिक घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो.
एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अधिक कृत्रिम तलावांची गरज

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आणि गणपती विसर्जनाला चौपाटी, तलाव या ठिकाणी होणारी गणेश विसर्जनाची मोठी गर्दी आणि कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी संपूर्ण मुंबईतील प्रत्येक वॉर्डांत 5 ते 10 कृत्रिम तलाव तयार करण्याची मागणी आम्ही केली आहे. यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांना निवेदन दिले असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
– नितीन डिचोलकर, समन्वयक विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ