
देशातील इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि फार्मसी महाविद्यालये येत्या 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जुन्या विद्यार्थ्यांचे वर्ग 16 ऑगस्टपासून आणि नव्या विद्यार्थ्यांचे 16 सप्टेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाइन वर्ग घेण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एआयसीटीई’ने नव्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे राऊंड कमी केले आहेत. दरवर्षी प्रवेशाचे सहा ते सात राऊंड होतात. या वर्षी फक्त दोनच राऊंड घेतले जाणार आहेत. मॅनेजमेंटचा डिप्लोमा, पदव्युत्तर डिप्लोमा आणि मॅनेजमेंटचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेणाऱ्या महाविद्यालयांचे वर्ग 15 जुलैपासून सुरू केले जाणार आहेत.
दरवर्षी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग जुलैमध्ये, तर नवी बॅच ऑगस्टपासून सुरू होते. नव्या बॅचसाठी ऑगस्टमध्ये प्रवेश सुरू केले जाणार आहेत. दरवर्षी ती प्रक्रिया जूनमध्ये सुरू होते आणि ऑगस्टपर्यंत सहा-सात राऊंड होतात. या वर्षी ही प्रक्रिया 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले आहेत.

























































