
कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी मस्टरवरच हजेरी लावावी. मात्र, पालिका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्यांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक आहे, असे पालिका प्रशासनाने आज स्पष्ट केले. कर्मचार्यांच्या 100 टक्के उपस्थितीवरही मात्र पालिका प्रशासन ठाम आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यांत मुंंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करून ती मस्टरवर सुरू करण्यात आली. मात्र, 6 जुलैपासून पुन्हा बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक पालिकेने काढले. त्याला सर्व कामगार-कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आणि कर्मचारी-कामगार समन्वय समितीचीही बैठक झाली. या बैठकीत बायोमेट्रिकचा निर्णय मागे घेण्याबाबत सहमती झाली. त्याबाबत आज पालिकेने परिपत्रक काढून सरसकट बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे घेत केवळ पालिका रुग्णालयांतील कर्मचार्यांसाठी बायोमेट्रिक बंधनकारक केले आहे.
कर्मचार्यांची एकदाच वैद्यकीय तपासणी
पालिका रुग्णालये किंवा दवाखान्यातून कोरोनामुक्त झालेल्या पालिका कर्मचार्यांना रुग्ण बरा झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, कामावर हजर होण्यासाठी पालिका प्रशासन कोरोनामुक्त झालेल्या कर्मचार्याला पुन्हा वैद्यकीय तपासणी करायला लावते. मात्र, आता अशी तपासणी न करता कर्मचार्यांना थेट कामावर रुजू होता येणार आहे.






























































