मालवणात मुसळधार पावसात आंब्याचे झाड कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. सर्वत्र पाणी पातळीतही वाढ झाली असून पडझडीच्या घटना घडत आहेत. शहरात पंचायत समिती मार्गासमोर राहणाऱ्या शशांक घुर्ये यांच्या यांच्या घराजवळील मोठे आंब्याचे झाड कोसळले.

घुर्ये यांच्या परिसरात मेथर कुटुंब राहतात. सुदैवाने मेथर यांच्या घराच्या बाजूला झाड कोसळले. त्यामुळे घराचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर घरासमोर असलेली कारही थोडक्यात बचावली. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या मुख्य वीज वाहिन्यांवर झाड कोसळले. झाड कोसळल्याने एक माडाचे झाड जमीनदोस्त होऊन नुकसान झाले.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तत्काळ वीज वितरण व पालिका प्रशासनास माहिती दिली. बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केला.  पालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील फांद्या हटवत मार्ग खुला केला. दुपारी उशिरा पर्यंत झाड तोडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.