
कॉमेडीच्या अचूक टायमिंगने गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांना आज दुपारी माझगाव येथील शिया कब्रस्तानमध्ये सुपूर्द-ए-खाक करण्यात आले. यावेळी जाफरी कुटुंबियांसह बॉलिवूडच्या मोजक्याच कलाकारांची उपस्थिती होती.
तब्बल ४०० हून अधिक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणाऱ्या आणि ‘शोले’मधील सूरमा भोपाली ही भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेते जगदीप यांचे खरे नाव इश्तियाक अहमद जाफरी होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. ते ८१ वर्षांचे होते. दरम्यान आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुलगा जावेद जाफरी, नावेद जाफरी यांच्यासह जाफरी कुटुंबीय, अभिनेते जॉनी लिव्हर आदी उपस्थित होते. दरम्यान, जगदीप यांच्या जाण्याने बॉलिवूडला धक्का बसला असून आणखी एक तारा जमिनीवरून आकाशात गेला, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. धर्मेंद्र, अजय देवगण, मनोज वाजपेयी, अनिल कपूर आदी कलाकारांनी देखील ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.
शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल !
अभिनेते जगदीप यांच्या निधनानंतर त्यांचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २९ मार्च २०१८ चा असून जावेद जाफरी याने पोस्ट केला होता. यात त्यांनी सूरमा भोपालीचा डायलॉग म्हटला आहे. व्हिडीओच्या शेवटी ‘हसत हसत या आणि हसत हसत जा’ असे म्हटले होते. आपल्या विनोदी भूमिकांनी कायम सर्वांना हसवणारा कलाकार आज आम्हाला रडवून गेला, अशी भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.































































