
कोरोना लढ्यासाठी पालिकेला जादा तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पालिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ अशा 206 जागांची भरती करणार आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना उपचार केंद्र व विविध रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यांकरिता ही भरती करण्यात येणार आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना केअर सेंटर सुरू केल्यामुळे तंत्र कुशल मनुष्यबळाची गरज वाढली आहे. त्यामुळे निम वैद्यकीय संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, इ.सी.जी. तंत्रज्ञ व औषध निर्माता अशी एकूण 206 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांकरिता महिना 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. 24 जुलैपर्यंत सुट्टीचे दिवस वगळता इच्छुक उमेदवारांना व्यक्तीश: सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. के.बी. भाभा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ.आर.के. पाटकर मार्ग, वांद्रे पश्चिम या ठिकाणीच अर्ज करता येणार आहेत.


























































