नाशिक : सारुळच्या ‘स्मार्ट’ शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य ही आपली जबाबदारी’ या भावनेतून पुढाकार घेतल्यास जिल्हा परिषद शाळा खासगी शाळांनाही मागे टाकू शकतात याचा आदर्श नाशिकजवळील छोटय़ाशा सारुळ गावातील शाळेने व शिवसेनेचे उपसरपंच सदानंद नवले यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांच्यामुळे शाळेला स्मार्ट टीव्हीसह शैक्षणिक साहित्य, सॅनिटायझर मशीन, स्वयंपाक खोली, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही उपलब्ध झाले. प्रशस्त मैदान, वृक्षराजीची सोबत यामुळे शिक्षणाला पोषक वातावरण मिळाले आहे. कोरोनाच्या संकटातही शिक्षकांनी ऑनलाइन धडे देत शिक्षणात खंड पडू दिला नाही.

सारुळ जिल्हा परिषद शाळेचे अल्पावधीतच रूप पालटले आहे. येथे पहिली ते सहावीचे एकूण 120 विद्यार्थी आहेत. त्यांना हसत-खेळत शिक्षण मिळावे, दृकश्राव्य माध्यमाची त्याला जोड असावी म्हणून उपसरपंच सदानंद नवले यांनी प्रत्येक वर्गासाठी एक याप्रमाणे सहा स्मार्ट टीव्ही दिल्याने शैक्षणिक व्हिडीओद्वारे शिकवणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर प्रोजेक्टर, संगणक, प्रिंटर, इन्व्हर्टर, साऊंड सिस्टीम, पंखे, दिवे उपलब्ध करून देत कुठलीही कसर ठेवली नाही. नुकतेच किचन शेड, पाण्याची टाकी, वॉटर प्युरिफायरचीही व्यवस्था करण्यात आली. रंगरंगोटीचे कामही करण्यात आले आहे. मुलांना दोन वर्षांपासून वह्या, बूट व मोजे वाटप केले आहे. शाळेच्या सुरक्षेसाठी आवारात चार सीसीटीव्ही बसविले आहेत. पेव्हर ब्लॉकचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या परिपाठासाठी व्यवस्था केली आहे. यासाठी सरपंच इंदूबाई भोईर, मुख्याध्यापक अंकुश कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, शिक्षक तिलोत्तमा बाविस्कर, प्रल्हाद भामरे, मीना मोरे, दीपाली देशमुख, अश्विनी पाटील, ग्रामसेवक रवींद्र जाधव यांनीही सहकार्य केले.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांनी शैक्षणिक व्हिडीओव्दारे व्हॉट्सऍप ग्रुपवरून शिक्षण सुरू ठेवले आहे. स्मार्ट फोन नसलेल्या मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिका तयार करून घरपोच दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षक प्रल्हाद भामरे यांनी दिली.

निर्जंतुकीकरण केले

ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेला पॅडल असलेले दोन सॅनिटायझरचे मशीन पुरवले. शाळा आवाराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून दिले आहे.