लोकल प्रवासासाठी `क्यू-आर’ कोडची मुदत 30 जुलैपर्यंत वाढविली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करताना `क्यू-आर’ कोडचा ई-पास बंधनकारक केला असून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आता 30 जुलैपासून होणार आहे. हे `क्यूआर’ कोडचे ओळखपत्र आणि रेल्वेचे तिकीट याद्वारेच अत्यावश्यक लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

15 जूनपासून राज्य सरकारच्या सूचनेवरून अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी उपनगरीय लोकलच्या मर्यादित स्वरुपातील सेवा सुरू केली आहे. या लोकल सेवेतील कामगारांची ओळखपत्र तपासणी करणे जिकिरीचे होत असल्याने त्यांना ‘क्यूआर’कोडचे ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी रेल्वे लावून धरली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अखेर पावले उचलली आहेत. कामगारांनी आपली संपूर्ण माहिती आपल्या कार्यालय प्रमुखांना भरुन द्यावी, त्यानंतर प्रत्येक आस्थापनांसाठी नेमलेले नोडल अधिकारी हे अर्ज सॉफ्ट आणि हार्ड कॉपी स्वरुपात मुंबई पोलीस आयुक्तालय कम्पाऊंड मधील नव्या प्रशासकीय इमारतीतील टेक्नॉलॉजी सेलमध्ये प्रमोद सावंत किंवा देवांश शुक्ला किंवा ज्योतीमणी यांच्याकडे सादर करतील, त्यानंतर `क्यूआर’ नंबर प्रत्येकाला पाठवण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयाच्या नोडल अधिकार्यांनी राज्य सरकारच्या कार्यालयातून ई – पास मिळविण्यासाठी समन्वय साधावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी केले आहे.