
जालना जिल्ह्यातील व परतूर तालुक्यातील आष्टी येथील व्यापारी संकुलात असलेल्या मंदिरातील मूर्तीची तोडफोड एका माथेफिरूने केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. त्यानंतर त्या माथेफिरुने गावातील सराफा दुकानात चोरी करून दुकानाची जाळपोळ केली. या घटनेच्या निषेधार्थ दिवसभर आष्टी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले व्यापारी संकुल परिसरात असलेल्या देवीच्या मंदिराच्या गेटचे कडीकोयंडा तोडून मंदिरातील एका मूर्तीची तोडफोड करण्यात आली. तसेच महावीर चौक परिसरात असलेल्या नमोकार ज्वेलर्सचे दुकान फोडून त्या ठिकाणी सोन्या-चांदीचे दागिने व गल्ल्यातील 13 हजार पाचशे रुपये चोरून दुकानाला आग लावली. या घटनेची माहिती सकाळी मिळताच गावातील सर्व व्यापारी व गावकऱ्यांनी एकत्रित येत आष्टी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांना निवेदन दिले आणि घटनेच्या निषेधार्थ दिवसभर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात ओमकार तान्हाजी डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजीम शेख समद याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस.डी.बांगर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, उपनिरीक्षक राजधर पठाडे यांच्यासह श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांनी
भेट देत पाहणी केली आहे.





























































