
लॉकडाऊन काळातील घरगुती वीज ग्राहकांच्या थकीत वीज बिलावर लागणारे व्याज महावितरणने सरसकट माफ केले आहे. कोरोना महामारीच्या काळात व्याज माफ झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असला तरी महावितरणला सुमारे 125 कोटी रुपयांचा शॉक बसणार आहे. व्याजाची सदर रक्कम कसूल केली जाणार नसल्याने त्यांचा भार महावितरणच्या डोक्यावर राहणार आहे.
महावितरणचे राज्यात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या एक कोटी 80 लाख आहे. लॉक डाऊन काळात सर्वचजण घरी बसून असल्याने ग्राहकांच्या वीज वापरात मोठी वाढ झाली आहे. मार्चपासून ग्राहकांच्या वीज वापराचे रिडींग घेतले नव्हते. मात्र जूनमध्ये जेव्हा रिडींग घेऊन तीन महिन्याचे एकत्रित बिल दिले तेव्हा अवाच्या सवा बिल दिल्याचा आरोप ग्राहकांनी केला. त्यामुळे सदर बिल समान तीन हप्त्यामध्ये भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच थकीत बिलावर आकारले जाणारे 9-10 टक्के व्याज माफ केले आहे.
महावितरणचे महिन्याचे बिलिंग सुमारे 5600 कोटी रुपये होते. त्यामध्ये घरगुती ग्राहकांचे 1800 कोटी रुपये बिलिंग असते. लॉक डाऊन काळातील तीन महिन्यांच्या थकीत बिलाचा आकडा साडे पाच हजार कोटीवर पोहचला आहे. त्यावर दोन महिन्याचे सुमारे सव्वाशे कोटी रुपये व्याज होत आहे. मात्र त्या व्याजपासून महावितरणला मुकावे लागले आहे.
सरकारने भार न उचलल्यास ग्राहकांच्या डोक्यावर येणार
राज्य सरकारच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना वीज बिलावरील व्याज माफ केले आहे. त्यामुळे व्याजाचा हा भार राज्य सरकारने उचलणे आवश्यक असल्याचे महावितरणच्या एका वरीष्ठ अधिकाऱयाने सांगितले. मात्र सरकारने सदर रक्कम महावितरणला न दिल्यास शेवटी त्याचा भार वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांवर पडणार आहे.


























































