राम मंदिर भूमीपूजनाची जोरदार तयारी, पंतप्रधान मोदींसह 50 VIPची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत राम मंदिर भूमीपूजनाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह 50 व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टने ही माहिती दिली आहे. पण पंतप्रधान कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिलेला नाही. तसेच या कार्यक्रमात राम मंदिर आंदोलनाशी निगडीत सर्व भाजपचे वरिष्ठ नेत्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेले उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्चे आलोक कुमार आणि मिलिंद परांदे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. तसेच सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे इतर नेतेही या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात.

या कार्यक्रमात 50 व्हीआयपी हजर असतील. त्यात पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिगचे पालन केले जाईल. तसेच कार्यक्रमस्थळी पाच मोठे स्क्रील लावण्यात येईल जेणेकरून सर्व भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.