
सटाणा तालुक्यातील आरोग्य सेवा मृत्युशय्येवर निपचित पडली आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील 279 पदांपैकी तब्बल 75 पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनासारख्या आजाराने तालुक्याला वेढलेले असताना ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मात्र निपचित पडली आहे.
बागलाण तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. 171 गावे असलेला हा सर्वाधिक मोठा तालुका. साल्हेर-मुल्हेरसह पश्चिम भाग हा पूर्णत: आदिवासी भाग आहे. तालुक्यातील सटाणा, नामपूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून तर अकरा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जात आहे. तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवण्यात येत असते.
रिक्त पदे…
बागलाणसाठी 22 वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजूर पदे असताना 12 पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक पुरुष वर्गाची 14 पदे, आरोग्य सहायकांचे 1 पद, आरोग्य सेविका महिला वर्गाची 18 पदे, आरोग्य सेविका एनएचएम वर्गात 4 पदे, आरोग्य सहायक महिला प्रवर्गाची 6 पदे, औषध निर्माण अधिकारी वर्गाची 2 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची 2 पदे, तर कनिष्ठ सहायकांची 2 तर परिचर 14 पदे, वैद्यकीय अधिकारी वर्गाची सर्वाधिक 12 पदे रिक्त आहेत. शासनाकडे सातत्याने रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असुन आगामी काळात शासनाकडून पदे मंजूर होतील – डॉ. हेमंत अहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी.


























































