
इयत्ता दुसरीपासून बास्केटबॉलची सुरुवात… सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व… अन् आता सेंट्रल रेल्वे महिला संघाचे प्रशिक्षकपद… ही सक्सेसफुल स्टोरी ठाण्याच्या बास्केटबॉलपटू मनीषा डांगे यांची. सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीला असलेल्या मनीषा डांगे यांना आता बास्केटबॉल या खेळाला प्रगतिपथावर नेण्याचा ध्यास लागून राहिला आहे. आगामी काळात `साई’ केंद्रामध्ये काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. `साई’शी जोडल्यानंतर बास्केटबॉल या खेळाला पुढे नेऊ शकते, असे मनीषा डांगे यांनी दैनिक `सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आवर्जून सांगितले.
प्रगती होतेय
मी पती व सासूसासNयांसोबत ठाण्यात राहते. माझे शिक्षण डोंबिवलीत पूर्ण झाले. शालेय स्तरापासूनच बास्केटबॉल खेळतेय. आधीच्यापेक्षा आता बास्केटबॉलमध्ये प्रगती होताना दिसत आहे. हिंदुस्थानी महिलांच्या संघाने आशियाई रँकिंगमध्ये मोठी मजल मारलीय. पुरुषांचा संघही चांगली कामगिरी करतोय. हिंदुस्थान बास्केटबॉलमध्ये नक्कीच मोठी मजल मारेल, असा विश्वास पुढे मनीषा डांगे यांनी व्यक्त केला.
लस आल्यानंतरच…
कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. शिवाय बास्केटबॉल हा बॉडी कॉन्टॅक्ट खेळ आहे. त्यामुळे लस आल्याशिवाय या खेळाच्या स्पर्धा होण्याची शक्यता फार कमीच आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सरावाला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता मनीषा डांगे यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, कोरोनामुळे अखिल िंहदुस्थानी बास्केटबॉल तसेच राष्ट्रीय स्पर्धाही होऊ शकल्या नाहीत, असे त्यांनी पुढे सांगितले.
टेरेसवर फिटनेस अन् ऑनलाइन मार्गदर्शन
महाराष्ट्रासह हिंदुस्थानात मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. आता या गोष्टीला चार महिने होताहेत. बास्केटबॉल हा खेळ इयत्ता दुसरीपासून खेळत आहे. त्यामुळे खेळासाठी लागणारा फिटनेस हा नित्यनियमाचा भाग होऊन बसलाय. त्यामुळे फिटनेससाठी सांगावे लागत नाही. लॉकडाऊनमध्ये आमच्या टेरेसवर फिटनेससाठी विविध प्रकारचा व्यायाम केला. एवढेच नव्हे तर महिलांच्या सेंट्रल रेल्वे संघाची प्रशिक्षिका असल्यामुळे झूमवर खेळाडूंसाठी ऑनलाइन मार्गदर्शन शिबिरही सुरू केले आहे. यामध्ये खेळाडूंना डाएट, मानसशास्त्रज्ञ, योगा आदीबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे मनीषा डांगे यावेळी म्हणाल्या.
खूप बदल झालाय
आमच्या काळात बास्केटबॉल या खेळात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. सध्याच्या काळातील युवा बास्केटबॉलपटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ मिळत आहे. आता जवळपास एक महिन्यांचे सराव शिबिर आयोजित केले जाते. खेळामध्ये सुधारणा होण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाते. आशियाई तसेच कॉमनवेल्थसारख्या मोठ्या स्पर्धांआधी खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवले जाते, असे स्पष्ट मत मनीषा डांगे यांनी व्यक्त केले.






























































