भरपावसात राजभवनावर काँग्रेसचे आंदोलन,राजभवन राजकारणाचा अड्डा बनल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे. राजभवन राजकारणाचा अड्डा बनली आहेत, असा आरोप करत राजस्थानमधील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसच्या वतीने भरपावसात राजभवनावर आंदोलन करण्यात आले.

राजस्थानमधील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संविधान आणि लोकशाही परंपरांना पायदळी तुडवत राजस्थानचे राज्यपाल लोकनियुक्त सरकार पाडण्यासाठी भाजपला मदत होईल अशा प्रकारे वागत आहेत. याचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राजभवनासमोर आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकारचा आणि राज्यपालांचा निषेध केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

याकेळी माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. पण 2014 साली केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप सातत्याने जनमताचा अनादर करत आहे. सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून विविध राज्यांतील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडणे व अनैतिक व भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवणे हीच भाजपची कार्यपद्धती राहिली आहे, अशी टीका त्यांनी केली.