
कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांचे वापरलेल्या पीपीई किटची विल्हेवाट न लावताच, ती स्मशानभूमीत उघड्यावरच काढून टाकण्यात येत असल्याचा अत्यंत गंभीर आणि धोकादायक प्रकार समोर आला आहे. जबाबदार अधिका-यांचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, प्रशासनाच्या मर्यादा तोकड्या पडत असून, सर्वांनीच यापुढे तरी स्वत: खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
एकीकडे कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत असतानाच, दुसरीकडे बेफिकीरपणाही तितकाच धोकादायक ठरू लागल्याचे आतापर्यंत अनेक वेळा दिसून आले आहे. आतासुद्धा येथील पंचगंगा स्मशानभूमीतही असाच बेफिकीरपणा समोर आला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजारहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात शहरात झाली आहे. तसेच बाधित मृत्युंच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या शहरात पाच ते सहा रुग्ण दररोज दगावत असल्याचे चित्र आहे. अशा बाधित व दगावलेल्या रुग्णांवर त्यांचे चार-पाच नातेवाईक,मित्रांकडून पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतो. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी, त्यांना मेडिकल मधून स्वत:च खरेदी कलेले पीपीई किट घालून हे अंत्यसंस्कार करावे लागते. अंत्यसंस्कारानंतर वास्तविक वापरलेल्या या पीपीई किटची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पण यासंदर्भात येथे कसलीच खबरदारी घेण्याचे नियोजन नसल्याने, असे पीपीई किट वापरानंतर स्मशानभूमीच्या परिसरात झाडाझुडुपांमध्ये बेफिकीरपणे काढून टाकण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. आसपासच्या वसाहतीतील लहान मुलांसह नागरिकांची येथे वर्दळ असते. त्यामुळे अस्ताव्यस्त पडलेल्या या पीपीई किटमुळे धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, यासंदर्भात महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलिप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, अशी पीपीई किट गोळा करून, त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना तात्काळ कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे, त्यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले.





























































