
सुसाट वेग, खतरनाक रेंज असलेले, ज्याच्या गर्जनेनेच शत्रूचा थरकाप उडतो असे महाशक्तीशाली, बाहुबली राफेल फायटर पाच विमानांचे हिंदुस्थानात आगमन झाले आहे. बुधवारी अंबाला हवाई तळावर हॅप्पी लँडिंग झाले. ‘राफेल’ आल्यामुळे हिंदुस्थानची हवाई दलाची ताकद अनेक पट वाढली असून, चीन, पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांना आता मोठा धडा मिळेल असा विश्वास संरक्षण तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
ही बातमी वाचलीत का ? – मराठमोळ्या सौरभ अम्बुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान
फ्रान्सच्या राफेल फायटर जेटची अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होती. फ्रान्सच्या दे सॉल्ट कंपनीबरोबर 36 राफेल फायटर जेट खरेदीचा 58 हजार कोटींचा करार झाला आहे. आजअखेर पाच राफेलची पहिली तुकडी हिंदुस्थानात दाखल झाली.
संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला व्हिडीओ
आकाशाला गवसणी घालणारे राफेल लढाऊ विमान अंबाला एअरबेसवर लँडिंग होताच अत्यंत नेत्रदीपक आणि चित्तथरारक व्हिडीओ संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला आहे. यात पाच राफेलबरोबर दोन एसयु-30 हे संरक्षण विमाने दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी केला संस्कृत श्लोक ट्विट
राफेलच्या लँडींगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत श्लोक ट्विट केला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानच्या संरक्षण इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे असे म्हटले आहे.
Rafale : काय आहे राफेलच्या स्वागतावेळी पंतप्रधान मोदींनी केलेल्या ‘ट्विट’चा अर्थ
चीनच्या जे-20, पाकच्या जेएफ-17 पेक्षा राफेल प्रचंड शक्तिशाली
चीनकडे चेंगडू जे -20 आणि पाकिस्तानकडे जेएफ-17 लढाऊ विमाने आहेत. पण हिंदुस्थानचे ‘राफेल’ बाहुबली आहे. ‘राफेल’ची क्षमता, शक्ती प्रचंड आहे. राफेलमुळे हिंदुस्थानी हवाईदलाची शक्ती वाढली आहे.
- रेंज- राफेलची रेंज 3700 किलोमीटर आहे. चीनच्या जे -20 ची रेंज ताशी 2700 कि.मी. आहे. पण हा वेग सिद्ध झालेला नाही. पाकच्या जेएफ-17 ची रेंज 1200 कि.मी. आहे.
- टार्गेट- राफेलच्या रडारमध्ये 100 कि.मी.च्या रेंजमधील 40 टार्गेट शोधण्याची क्षमता आहे. चीन आणि पाकच्या विमानांमध्ये एवढी क्षमता नाही.
- वजन -राफेलचे वजन हलके 9900 ते 10600 किलो आहे, पण भार वाहून नेण्याची क्षमता तब्बल 37000 किलोपर्यंत आहे. चीनच्या जे-20 चे वजन 19 हजार किलो आणि भार वाहून नेण्याची क्षमता 37013 किलोपर्यंत आहे. पाकचे विमान केवळ 12474 किलो भार वाहू शकते.
- युद्धात सरस -सर्वात महत्त्वाचे म्हणजे राफेल विमानांनी युद्धभुमी गाजवली आहे. सर्व हवामानात राफेलची हल्ल्याची क्षमता आहे. चीनच्या जे -20 आणि पाकच्या जेएफ-17 ला युद्धाचा अनुभव नाही.
- उड्डाण -राफेल कितीही उंचावरून उडू शकते. आठ विमानांचे काम एक राफेल करते. चीन आणि पाकच्या विमानांना मर्यादा आहे.
- फ्रान्स येथून सोमवारी उड्डाण
फ्रान्सच्या मेरिनॅक एअरफोर्स तळावरून सोमवारी सकाळी पाच राफेल लढाऊ विमानांनी उड्डाण केले होते. मंगळवारी संयुक्त अरब अमिरातच्या अल जफ्राबेसवर ही विमाने थांबली. त्यानंतर आज हिंदुस्थानात आगमन झाले.
हिंदुस्थानी हवाईदलाचे बारा वैमानिक आणि इंजिनीअर्सनी फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेतले. पाच राफेल घेऊन हे वैमानिक अंबाला एअरबेसवर दाखल झाले.
राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअरबेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हाशिमारा येथे असणार आहे.
राफेल दाखल होणार असल्यामुळे अंबाला येथे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कलम 144 लागू करण्यात आले असून, फोटो काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
























































