
विद्यार्थी-शिक्षकांसाठी समुपदेश कार्यशाळा, सराव परीक्षा, ‘विद्यार्थी-शाळा दत्तक’ उपक्रम अशा उपाययोजनांसह विद्यार्थ्यांना नियमित दर्जेदार शिक्षण दिल्यामुळे या वर्षी पालिका शाळांचा दहावीचा एकूण निकाल 93.25 टक्के लागला. विशेष म्हणजे, 40.10 टक्के झालेली विक्रमी वाढही गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
राज्यभरातील विद्यार्थ्यांना मुंबई महापालिका शिक्षकांची शिकवणी
असा राबवला अॅक्शन प्लॅन
– अभ्यासक्रम ऑक्टोबर 2019पर्यंत शिकवून पूर्ण व्हावा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांच्या निर्देशानुसार 10 सराव परीक्षा, समुपदेशन वर्ग घेण्यात आले.
– ‘विद्यार्थी दत्तक’, निरीक्षकांच्या माध्यमातून ‘शाळा दत्तक’ उपक्रम, नियमित पालकसभा, अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग, व्याख्यानमाला असे उपक्रमही घेण्यात आले.
– 30 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून विभागनिहाय सामूहिक कार्यशाळा घेण्यात आल्या.
गेल्या वर्षी पालिकेचा दहावीचा निकाल 53.15 टक्के लागला होता. यामध्ये 2018 मध्ये लागलेल्या 73.81 टक्क्यांच्या निकालाच्या तुलनेत तब्बल 20.66 टक्क्यांची घट झाली होती. गेल्या वर्षी अंतर्गत गुण नसल्यामुळे निकाल घटल्याचा निष्कर्ष काढला गेला. तरी पालिकेकडून घटलेल्या निकालाची गंभीर दखल घेऊन दहावीचा निकाल वाढवण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करून काम करण्यात आले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या शिक्षण विभागात विशेष लक्ष घातले. आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, निकाल वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्या संकल्पना राबवण्यात आल्या. शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, सहआयुक्त आशुतोष सलील, शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी विशेष लक्ष ठेवून कार्यवाही केली. शिवसेना-युवासेनेच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत कौशल्य गुण तर मिळालेच शिवाय नियोजनबद्ध काम केल्याने एकूण 40.10 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली. अंतर्गत गुण मिळण्यासाठी पालिका पातळीवर शिवसेना, युवासेनेच्या माध्यमातून साईनाथ दुर्गे यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष पाठपुरावा केला.


























































