
मुंबईत कोसळणाऱ्य़ा विक्रमी पावसालाही भारी पडेल अशी कामगिरी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने केली आहे. गेल्या चार दिवसांत शहरात साचलेल्या 1 हजार 714 कोटी लिटर पाण्याचा निचरा जल विभागाच्या कर्मचाऱ्य़ांनी केला आहे. तुळशी तलावातील पाणीसाठ्यापेक्षा जास्त पाणीसाठ्याचा हा उपसा आहे. त्यासाठी 6 उदंचन केंद्रांतील 43 पंप 870 तास अखंडपणे हे उपशाचे काम करत होते.
मुंबईत गेले चार दिवस अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांत चटकन पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या अतिवृष्टीच्या काळात पालिकेच्या जल विभागांतील कर्मचाऱ्य़ांनी पाण्याचा प्रभावीपणे निचरा केला आहे. मुंबईत 3 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तेव्हापासून 6 ऑगस्टला सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व उदंचन केंद्रामधून तब्बल 17 हजार 145 दशलक्ष लिटर (1,714.50 कोटी लिटर) एवढ्या पाण्याचा उपसा करण्यात आला. तुळशी तलावाची साठवण क्षमता 8,046 दशलक्ष लिटर एवढी आहे.
मुंबईत हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), इर्ला (जुहू) आणि गजदरबंध (सांताक्रूज) अशी एकूण सहा उदंचन केंद्रे (पंपिंग स्टेशन) कार्यरत आहेत. यात एकूण 43 पंप असून यापैकी प्रत्येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला 6000 लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. याचाच अर्थ सर्व पंपांची एकत्रित क्षमता ही प्रत्येक सेकंदाला दोन लाख 58 हजार लिटर एवढ्या पाण्याचा उपसा करण्याची आहे. पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणाऱ्य़ा पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप संगणकीय प्रणालीद्वारे कार्यरत होतात.
लवग्रोव्ह उदंचन केंद्रातून सर्वाधिक उपसा
पाण्याचा सर्वाधिक उपसा हा लवग्रोव्ह उदंचन केंद्राद्वारे करण्यात आला. या केंद्राद्वारे 4,484.88 दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा उपसा करण्यात आला. हाजी अली उदंचन केंद्रातून 3,322.80 दशलक्ष लिटर, क्लिव्हलँड बंदर उदंचन केंद्रातून 2,766.96 दशलक्ष लिटर, इर्ला उदंचन केंद्रातून 2,533.68 दशलक्ष लिटर, ब्रिटानिया उदंचन केंद्रातून 2,484.36 दशलक्ष लिटर आणि गजदरबंध उदंचन केंद्रातून 1552.32 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला.


























































