
हिंदुस्थानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुजरातमधील कच्छच्या रणभूमीपासून 130 किलोमीटरवरील आपला भोलारी एअरबेस अपग्रेड केला आहे. या एअरबेसवर पाकिस्तानी हवाई दलाने 28 एफ-16 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. पाकिस्तानने या माध्यमातून हवाई हल्ल्याची तयारी सुरू केली असतानाच हिंदुस्थानही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज झाला आहे.
पाकिस्तानने अलिकडेच वादग्रस्त नकाशा जारी केला. त्यात हिंदुस्थानचा जुनागढ हा आपल्याच हद्दीत येत असल्याचा पोकळ दावा केला. या जुनागढपासून पाकिस्तानचा एअरबेस 480 किलोमीटर अंतरावर आहे. वादग्रस्त नकाशावरून हिंदुस्थानसोबत तणाव वाढल्याने पाकिस्तानने आपला एअरबेस अपग्रेड केला आहे. भोलारी एयरबेसवर एयरक्राफ्ट शेल्टरचे काम पूर्ण केले आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या या एअरबेसवर 16 एयरक्राफ्ट शेल्टर्स बनवण्यात आली आहेत, तर उर्वरित 12 शेल्टर्स बनवण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. ही नवीन शेल्टर्स विमानांचे हवाई हल्ल्यांपासून रक्षण करणार आहेत.
हवाई हल्ले उलथवण्यास हिंदुस्थानची तयारी
पाकिस्तानचा कुठलाही हवाई हल्ला उलथवून लावण्याची तयारी हिंदुस्थानने केली आहे. पाकिस्तानचा भोलारी एअरबेस असलेल्या परिसरातील हिंदुस्थानच्या एअरबेसची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे. हिंदुस्थानने याठिकाणी सुखोई, मिग-21 आणि जगुआर फाइटर जेट्स तैनात केले आहे.





























































