पुणे – शहरातील विविध भागात चोरट्यांचा धुडगूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शहरातील विविध भागातील सोसायट्यांमधील बंद फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी तब्बल 24 लाख 79 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या सर्व घटना आठवड्याभरात बिबवेवाडी, सोमवार पेठ, लोहगाव, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात घडल्या आहेत.

बिबबेवाडी भागातील श्रीरंग सोसायटीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 7 लाख 78 हजार 340 रुपयांचे दागिने लांबविले. ही घटना दोन दिवसापुर्वी घडली आहे. याप्रकरणी अश्विनी परब (वय 72) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी या जास्वदी सोसायटीत एकट्याच राहायला आहेत. 13 ऑगस्टला कामानिमित्त त्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून जवळपास 8 लाखांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी. बी. काळे तपास करत आहेत.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने मिळून 7 लाख 63 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी मोहित घुमे (वय 34, रा. लक्ष्मण निवास, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहित कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 5 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून 7 लाख 63 हजारांचा ऐवज चोरुन नेला. लोहगाव भागातील संतनगर परिसरात असलेल्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कपाटातील 6 लाख 91 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी माधुरी तांबे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. आर. गंधले तपास करत आहेत. सोमवार पेठेतील शानरचना सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी 2 लाख 47 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी मधुबाला उदगीर (वय ६९) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास करत आहेत.

लॉकडाउनंतर शिथिल झाल्यानंतर वाढल्या चोऱ्या

शहरातील लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉकडाउनमध्ये बहुतांश नागरिक घरात होते. त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत.