
>> द्वारकानाथ संझगिरी
महेंद्रसिंह धोनी निवृत्त झाला आणि त्याच्यापाठोपाठ सुरेश रैनासुद्धा. दोघांची दोस्ती एवढी घट्ट आहे की, रामासाठी लक्ष्मणाने वनवासास जावं तसा धोनीपाठोपाठ रैना निवृत्त झाला.
दोघांच्याही बाबतीत ऑ असं आश्चर्याने म्हणावं असं काही नव्हतं. धोनीच्या बाबतीत सचिनला जी मानवंदना शेवटी मिळाली ती मिळायला हवी होती असं मला वाटतं. म्हणजे सगळं कसं साग्रसंगीत! कदाचित कोविड्चं जे सावट भारतीय क्रिकेटवर आलंय त्यामुळे धोनीने हा निर्णय लवकर घेतला असावा. लिजंडचा मानसन्मान हा लिजंडसारखाच व्हायला हवा.
एखादा खेळाडू केवळ धावा, विकेट, झेल, विक्रम यामुळे लिजंड होत नाही. खेळाचं समाजजीवन ढवळून टाकण्याचं कार्य ज्यांच्या हातून होतं ते लिजंड होतात. अर्थात त्यासाठी उच्चकोटीचा परफॉर्मन्स लागतोच लागतो. माझ्या जाणत्या आयुष्यात मी चार क्रिकेटपटूंना लिजंड होताना पाहिलं.
पहिला सुनील गावसकर. त्याने प्रथम 10 हजार धावा केल्या, 34 शतकं ठोकली म्हणून केवळ नाही तर पुढच्या पिढीची वेगवान गोलंदाजी खेळण्याची भीती कमी केली. त्याला पाहून दहाव्या क्रमांकाचा फलंदाजसुद्धा चेंडूच्या रेषेत येऊन खेळायला लागला.
दुसरा कपिलदेव. त्याने भारतीय तरुणांना वेगवान गोलंदाज व्हायचं स्वप्नच दिलं. या मातीत वेगवान गोलंदाज निपजत नाहीत, हा भ्रम त्याने दूर केला. आज हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजी जगात सर्वोत्तम आहे.
तिसरा सचिन. त्याला पाहून क्रिकेट आवडणाऱया प्रत्येक आई-बापाला स्वप्न पडायला लागलं की, आपल्या पोटी सचिन जन्माला आलाय. त्याने क्रिकेट हिंदुस्थानच्या तळागाळात नेलं.
चौथा धोनी. जो सचिनचं पुढचं पाऊल होता. त्याने त्याच्या कर्तृत्ववाने ओरडून सांगितलं की, क्रिकेट हा फक्त मोठय़ा शहरातील मुलांचा खेळ नाही. तिंबकतू किंवा झुमरीतलैयाचा मुलगासुद्धा देशाचं नेतृत्व करू शकतो.
धोनीचा परफॉर्मन्स हा तसा शंभर नंबरी होता. सचिनला लिजंड करण्यात कसोटीबरोबर वनडे क्रिकेटचा वाटा मोठा होता. धोनीला लिजंड करण्यात वनडे आणि ट्वेंटी-ट्वेंटीचा वाटा होता. धोनी फक्त कसोटी क्रिकेट खेळत असता तर एक चांगला यष्टीरक्षक, फलंदाज यापलिकडे आपण धोनीकडे पाहिलं नसतं. अर्थात कसोटी कर्णधार धोनीने भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या सर्वोच्च स्थानावर (पहिल्या क्रमांकावर) नेऊन बसवलं, हे विसरता येणार नाही. वनडे आणि ट्वेंटीट्वेंटी क्रिकेटमध्ये धोनी क्रिकेटच्या इतिहासातला एक महापुरुष ठरला. बऱयाचदा तुमची गुणवत्ता आणि विशिष्ट काळ याचा मेळ जमावा लागतो. लता मंगेशकर 18व्या शतकात जन्माला आली असती तर? आज आपण केवढय़ा आनंदाला मुकलो असतो. आणि ती आजच्या एवढी मोठी झाली असती का? धोनीची गुणवत्ता ही अशी होती की, वनडेचा उत्कर्षाचा काळ आणि ट्वेंटीची सुरुवात यामुळे तिला वाव मिळाला. धोनीच्या बाबतीत काळ आणि गुणवत्ता याचा मेळ एकदम जुळला.
सचिनने भारतीय फलंदाजी सुसंस्कृतपणे आक्रमक केली. सेहवागने आक्रमण करताना सुसंस्कृतपणा कधी कधी मागच्या खिशात ठेवला. धोनीने ती स्फोटक केली. मुंबईचं सॉफीस्टिकेशन काढून त्यात रांचीचे रगेल रंग भरले. वनडेत शेवटच्या षटकात धोनीची फलंदाजी पाहताना आपली नाडी डेक्कन क्वीनसारखी पळायची. तो मात्र इतका शांत असायचा की, बुद्धसुद्धा हतबुद्ध झाला असता. जणू मॅचच्या विजयाची कथा त्यानेच लिहिली आहे आणि नियतीला त्याप्रमाणे घडवून आणण्याचा आदेश दिलाय, असा तो खेळायचा. बरं कधी तरी एकदा जिंकून दिलंय असं त्यात नव्हतं. कडय़ावरून न कोसळता चालणं ही त्याची मीठ-भाकर आहे, असं वाटायचं. त्याचं फलंदाजीचं तंत्र त्याचं स्वतःचं होतं. त्याचा बचाव जगाच्या कुठल्याही पुस्तकात सापडला नसता. तो बचाव पाहून सर जॅक हॉबज किंवा सर लेन हटन यांनी डोळे मिटले असते. त्याचा बॅट स्पीड भयानक होता… त्यात ताकद आणि टायमिंग घाला. त्यामुळे त्याचा फटका हा नॉकआऊट पंच असायचा. चेंडूलाही स्वतःच्या जिवाची भीती वाटली असावी. चौकार आणि षटकारांवर सुखात जगता येण्याची कुवत असूनही तो एकेरी, दुहेरी धावा असा धावायचा की, आयुष्यात आणखी धाव मिळण्याची त्याला शाश्वती नाहीय. हीसुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. वनडेत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याची सरासरी 50.72 आहे आणि तेसुद्धा 87.55च्या स्ट्राईक रेटने. त्यात 10 शतकं आणि 70 अर्धशतकं. खालच्या क्रमांकावर येऊन 10 शतकं! ही चक्रावणारी गोष्ट आहे.
यष्टीरक्षक धोनी मला जास्त वनडे आणि ट्वेंटीतला आवडतो. फलंदाजी किंवा गोलंदाजीप्रमाणे वनडे, ट्वेंटीतही यष्टिरक्षणात काही बदल करावे लागतात. यष्टिरक्षकाला वनडेत खूप एरिया कव्हर करावी लागते. धोनी स्टंपजवळ उभा राहिला की फलंदाजाला यष्टीचित असा करायचा की फलंदाजाला वाटायचं की त्याला हिप्नॉटाईझ केलंय.
पण मला सर्वात आवडायचं ते त्याचं नेतृत्व. एकेकाळी टायगर पतोडीने भारतीय संघ जिंकू शकेल, हा विश्वास संघात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तसा संघ बनवला. वाडेकरने तोच संघ धूर्तपणे विजयासाठी वापरला. गांगुलीनेही साधारण तेच केलं, जे पतोडीने केलं होतं. तो संघ धोनीला मिळाला. आणि धोनी ‘यश कदम चूम लेंगे’ हे वाक्य अक्षरशः जगला. कर्णधाराचं यश हे विजयात मोजावंच लागतं. पण म्हणून सर्वच यशस्वी कर्णधार महान नसतात. ट्वेंटीचा 2007चा वर्ल्डकप, 2011चा विश्वचषक, 2013ची चॅम्पियन ट्रॉपी या एकाच कर्णधाराने आजच्या स्पर्धात्मक जगात जिंकून देणं, हे पौराणिक काळाचा संदर्भ देऊन सांगायचं तर राजसूर्य यज्ञ आहे. वनडे, ट्वेंटीमध्ये काही निर्णय क्षणात घ्यावे लागतात. त्यासाठी जोखीमसुद्धा घ्यावी लागते. आणि कठीण परिस्थितीत डोकं शांत ठेवावं लागतं. देव काही माणसांना पृथ्वीवर पाठवताना डोक्यात अदृश्य एअर कंडिशनर ठेवून पाठवतो. तो मानवाच्या एमआरएमध्ये दिसत नाही. पण मैदानात जाणवतो. अजित वाडेकर हा आपला पहिला कॅप्टन कुल. धोनी हा दुसरा. त्याचे काही निर्णय डोक्याला झिंणझिंण्या आणतात. उदा. 2007 विश्वचषकात शेवटचं षटक जोगिंदरला देणे. कपाळावर मारलेला हात शेवटच्या चेंडूनंतर धोनीच्या पाठीवर कौतुकाने फिरवावासा वाटला. असे कित्तेक त्याचे निर्णय आहेत की, ते त्याक्षणी विचित्र वाटले. पण शेवटी तेच यशाचं भलंमोठं कुंकू मिरवत. मोठा क्षण ओळखण्यात तो दादा होता. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने तो फार लवकर ओळखला. युवराजला बाजूला सारून तो स्वतः फलंदाजीला आला आणि शेवटी षटकार मारून मॅच जिंकून दिली. आज त्या विश्वचषकाच्या बाबतीत मनावर सर्वात जास्त कोरला गेलेला तो क्षण आहे.
जगात यष्टिरक्षक कर्णधार फार कमी झालेत. पण धोनीने ते कष्टाचं काम करताना आपल्या निरीक्षणाचा प्रचंड फायदा संघाला करून दिला. तिची बेनॉ हा क्रिकेटच्या इतिहासातला एक श्रेष्ठ कर्णधार. तो नेहमी म्हणायचा की, ‘नेतृत्व म्हणजे 10 टक्के कौशल्य आणि 90 टक्के नशीब.’ धोनीकडे पहिले 10 टक्के तर होते आणि पुढचे 80 टक्के तर नक्कीच. नेतृत्व सोडल्यावरही तो बऱयाचदा मागे उभा राहून रिमोट कंट्रोल नेतृत्व करायचा. गोलंदाजांना सल्ला द्यायचा, क्षेत्ररचना करायचा आणि विराट कोहलीसारखा अहंमनय. माणूस ते तीर्थ स्वीकारल्याप्रमाणे स्वीकारायचा. कारण त्याला ते ठावूक होतं की ते तीर्थ त्याच्या भल्यासाठी आहे. धोनीच्या नेतृत्वाच्या कालखंडात एक गोष्ट मात्र मला जाणवली की, गांगुली, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग आणि युवराज ही मंडळी फार स्वेच्छेने निवृत्त झाली नाहीत.
त्याच्या शेवटच्या कालखंडात त्याच्या यष्टिरक्षणापेक्षा त्याची फलंदाजी पूर्वीच्या दर्जापेक्षा खालावली. ते हुकमी फटके त्याच्या शरीराचे हुकूम मानेनासे झाले. तेव्हाही त्याने कुठचे क्षण टाळायचे ते धूर्तपणे ठरवलं होतं. तो गेल्या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला आला नाही. कदाचित संघाला खांद्यावरून वाहून नेऊन जिंकून द्यायची ताकद आपली संपली आहे, असं त्याला वाटलं असेल. कुरुक्षेत्र जिंकल्यावर अर्जुनाचेही तेच झालं होतं. तो निवृत्तीच्या जवळ होताच होता. निवृत्तीचा क्षणसुद्धा त्याने विचारपूर्वक निवडला. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन.
खरंतर प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्र्ााrला खो द्यायची त्याला आता संधी आहे आणि कुवतही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याने सोडलं असेलं तरी क्रिकेट त्याने सोडू नये. रांचीच्या एका सामान्य टिकीट चेकरने जागतिक क्रिकेटमध्ये लिजंड व्हायचं ही गोष्ट एरव्ही परीकथाच वाटली असती. पण आपण ती डोळ्याने पाहिली आहे. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो.





























































