
पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱया विद्यार्थ्यांनाच या देशात जगण्याचा मुलभूत अधिकार नाही का? असा हृदयस्पर्शी सवाल करत देशभरातील विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा होणार की नाही याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी अडून बसला आहे तर देशभरातील विद्यार्थी परीक्षा रद्द व्हावी यासाठी न्यायालयाला आग्रह करत आहेत. सर्वेच्च न्यायालयात त्यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. 31 विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱया याचिका सर्वेच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या देशाची मुले म्हणून हीच किंमत आम्हाला चुकवावी लागणार का? असा सवाल या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. केवळ पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱया विद्यार्थ्यांनाच जगण्याचा मुलभूत अधिकार नाही का असा सवालही विद्यार्थ्यांनी केला आहे.


























































