
जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच मलेशियात आतापर्यंतचा सर्वांत घातक कोरोनाचे स्वरुप आढळून आले आहे. या नव्या कोरोना विषाणूचा प्रभाव सामान्य कोरोनाच्या 10 टक्के अधिक भयंकर असल्याचे सांगण्यात येत आहे. डी 614 जी असे या कोरोनाचे नाव असून जुलै 2020 मध्ये या स्वरुपाचा कोरोना प्रथम समोर आला होता. मलेशियात प्रत्येक 45 कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत 3 जणांना या स्वरुपाच्या कोरोनाची लागण झाल्याचे निर्दशनात आले आहे.
हिंदुस्थानातून मलेशियात गेलेल्या एका हॉटेल मालकाला या कोरोनाची प्रथम लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या हॉटेल मालकाला होम क्वारंटाईन राहण्याची सूचना दिली होती. मात्र त्याने ती न पाळल्याने या कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या मालकाला 5 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय मलेशियात फिलिपाईंन्सवरुन परतलेल्या काही जणांना देखील या स्वरुपाचा कोरोना झाल्याचे कळते. त्यामुळे कोरोनाची लस तयार करताना अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे वेगवेगळे प्रकार
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोना वेगवेगळ्या रुपात समोर येत आहेत. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. युरोपमध्ये देखील हे प्रमाण अधिक असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे देखील लसच्या निर्मितीला फटका बसत असल्याचे संघटनेने नमूद केले.
मलेशियात आढळून आलेला
डी 614 जी हा कोरोनाचा प्रकार लक्षात घेता स्थानिकांना खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. आम्हांला स्थानिकांच्या मदतीची गरज आहे. जेणेकरुन आम्ही कोरोनाची ही साखळी तोडू शकू. – नूर हिशाम अब्दुला, संचालक, जनरल हेल्थ, मलेशिया

























































